राज्यात सुरू होणार १० नवीन वैद्यकीय महाविद्यालय

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. मुंबई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय वैद्यक परिषदेने 50 (एमबीबीएस) विद्यार्थी क्षमतेची परवानगी दिलेली आहे. उर्वरीत 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे अर्ज राष्ट्रीय वैद्यक परिषदेमार्फत दर्शविण्यात आलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले की, शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता जिल्हा गडचिरोली, जालना, वाशीम, हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, भंडारा, अंबरनाथ (जिल्हा ठाणे) आणि मुंबई (10 संस्था) येथे 100 (एमबीबीएस) विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याकरिता राष्ट्रीय वैद्यक परिषद, नवी दिल्ली यांना अर्ज सादर करण्यात आले होते. सध्या नीट-यूजी-2024 ची परीक्षा पुढे गेली असल्यामुळे सदर 9 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी प्राप्त करुन घेऊन, या शैक्षणिक वर्षी एमबीबीएस प्रथम वर्षाचे प्रवेश करण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली आहे.

Protected Content