‘निर्भया’ बलात्कार प्रकरणातील आरोपींना एकाच वेळी होऊ शकते फाशी

nirbhay

नवी दिल्ली वृत्तसंस्था । देशभर गाजलेल्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणातल्या आरोपींना एकाच वेळी फाशी होण्याची शक्यता आहे. तिहार तुरुंग प्रशासनाकडून तयारी सुरु झाली आहे. मात्र, आरोपींना नेमकी कधी फाशी होईल, याबाबत अद्यापही तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आलेले नाही.

पतियाळा हाऊस कोर्टाने शुक्रवारी दोषींच्या डेथ वॉरंटवरील सुनावणी तहकूब केली आहे. तसेच एका दोषीची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. त्यामुळे फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास लांबणीवर पडू शकते. निर्भया प्रकरणातील चौघा दोषींना फासावर लटकावण्याची तयारी तुरुंग प्रशासनाने सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकाच वेळी चौघांना फाशी देण्यासाठी नव्या तंत्राचे परीक्षण करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी फासावर लटकावले जाते, त्यात काही बदल करण्याचे काम सुरू आहे, असे समजते. चौघांचे वजन एकाच वेळी उचलण्याची क्षमता आहे की नाही हे तपासले जात आहे. चौघांना एकाच वेळी फाशी देणे आवश्यक आहे. अंमलबजावणीवेळी एखाद्याला अस्वस्थ वाटू लागले तर, तो आजारी होऊ शकतो आणि फाशी टळू शकते. निर्भया बलात्कार प्रकरणातील चौघा आरोपींच्या फाशीच्या अंमलबजावणीबाबतचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता गृहित धरून तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेशकडे दोन जल्लादांची मागणी केली आहे.

Protected Content