उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे कृषिपंपाच्या १ लाख १७ हजार वीजजोडण्यांची कामे पूर्ण

जळगाव प्रतिनिधी । राज्यातील अतिवृष्टी, महापूर व चक्रीवादळाचे तडाखे, सलग दीडदोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव, नवीन तंत्रज्ञानाच्या रोहित्रांचे मर्यादित उत्पादन यासह अनेक अडथळ्यांवर मात करीत महावितरणने उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतून (एचव्हीडीएस) ३१ मार्च १८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषिपंपांच्या १ लाख १७ हजार ७७४ नवीन वीजजोडण्या कार्यान्वित केल्या आहेत.  

राज्यात ३१ मार्च २०१८ पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या २ लाख २४ हजार कृषिपंपांच्या नवीन वीजजोडणीसाठी राज्य शासनाने उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरू केली. त्याप्रमाणे स्वतंत्र रोहित्राद्वारे प्रत्येकी एक किंवा जास्तीत जास्त दोन कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात येत आहेत. या योजनेसाठी राज्य शासनाने ५ हजार ४८ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यात २ हजार २४८ कोटी ९ लाखांचा निधी राज्य शासनाकडून विदर्भ व मराठवाड्याकरिता अनुदान स्वरूपात मिळणार असून उर्वरित महाराष्ट्राकरिता २ हजार ७९९  कोटी ५९  लाख रुपयांचा निधी महावितरण वित्तीय संस्थांकडून कर्ज स्वरूपात घेणार आहे. ३१ मार्च २०१८ नंतर उच्चदाब वितरण प्रणाली योजना सुरू होईपर्यंत विविध योजनांमार्फत कृषिपंपांच्या वीजजोडण्या देण्यात आल्याने पैसे भरून प्रलंबित असलेल्या उर्वरित १ लाख ५८  हजार २६ नवीन वीजजोडण्या उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे देण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यासाठी १८५ नवीन उपकेंद्रांसह उच्चदाब वीजवाहिन्या, वितरण रोहित्र आदी यंत्रणेचे जाळे उभारण्यात येत आहे.

महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणालीमधून कृषिपंपांच्या नवीन वीजजोडण्या देण्याचे काम वेगाने सुरू झाले. सर्व जिल्ह्यांसाठी ऑगस्ट २०१८ मध्ये ऑनलाईन निविदा काढून राज्यभरातील कंत्राटदारांना अंशत: व पूर्णत: निविदेप्रमाणे ६४८ कार्यादेश देण्यात आले. कामेदेखील वेगाने सुरू झाली. प्रामुख्याने ग्रामीण भागातील या कामांना अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आदींची फटका बसत गेला. तसेच या योजनेतील नव्या तंत्रज्ञानाच्या १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेच्या रोहित्रांची मागणी वाढली. त्यानंतर मार्च-२०२० पासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व  लॉकडाऊनमुळे रोहित्रांच्या उत्पादनावर मर्यादा आल्या. दरम्यान, राज्यात महापुराचे व चक्रीवादळाचे मोठे तडाखे बसले. यातही प्रामुख्याने ग्रामीण भागातील वीजयंत्रणेला तडाखे बसले. सलग दुसऱ्या वर्षीहीकोरोनामुळे संचारबंदी असल्याने त्याचाही कामावर परिणाम झाला. या सर्व अडथळ्यांवर मात करीत महावितरणने आतापर्यंत उच्चदाब वितरण प्रणाली योजनेतील १ लाख १७ हजार ७७४ कृषिपंपांच्या वीजजोडण्यांसाठी १ लाख १६ हजार ३६८  रोहित्र व उच्चदाब वीजवाहिन्या उभारण्याचे काम पूर्ण केले आहे.

कोकण प्रादेशिक विभागात कृषिपंपांच्या ३१ हजार ५४९  पैकी २४ हजार ९३४ (७९.०३ टक्के), नागपूर प्रादेशिक विभागात ४१ हजार ३२९  पैकी ३२ हजार १०  (७७.४५ टक्के), पुणे प्रादेशिक विभागात ३७ हजार ६७८ पैकी २८ हजार ८५५ (७६.५८ टक्के) आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागात ४७ हजार ४७० पैकी ३१ हजार ९७५ (६७.३५ टक्के) नवीन वीजजोडण्यांचे काम पूर्ण झाले आहे. यामध्ये उल्लेखनीय म्हणजे अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यामध्ये १ हजार ४९९  पैकी  १ हजार ४५६  (९७.१३ टक्के) कृषिपंपांच्या वीजजोडण्या कार्यान्वित झाल्या आहेत. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी या योजनेचा नुकताच आढावा घेतला. सद्यस्थितीत महावितरणकडून कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० नुसार १ एप्रिल २०२० पासून प्रलंबित वीजजोडण्या देण्याच काम वेगाने सुरु आहे. त्यासोबतच एचव्हीडीएस योजनेमधीलप्रलंबित वीजजोडण्यांचे काम वेगाने पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.

उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) शाश्वत व सुरळीत वीजपुरवठा होत आहे. उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने वीज अपघाताचा धोका नाही. उच्चदाब वाहिन्यांवरील वीजप्रवाह कमी झाल्यामुळे आकडे टाकून वीजचोरी करता येत नसल्याने वीजहानीमध्ये घट होत आहे. एचव्हीडीएसमधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषिपंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. कृषिपंपधारकांच्या वीजभाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यातयेत आहे. या प्रणालीमध्ये १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येत आहेत. उच्चदाब वाहिनी ही ग्राहकाच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनीविरहित वीजजोडणी आहे. त्यामुळे एचव्हीडीएस योजनेतील वीजजोडण्यांच्या कृषिपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होत आहे.

Protected Content