८२ वर्षीय ‘शाहीनबाग दादी’ शेतकरी आंदोलनात सहभागी

 

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी विरोधी आंदोलनाचा चेहरा आणि ‘शाहीनबाग दादी’ म्हणून प्रसिद्धी मिळालेल्या बिल्किस बानो यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. आज त्या सिंघु सीमेवर दाखल झाल्या.

‘आम्ही शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. आज आम्ही शेतकऱ्यांसोबत त्यांच्या विरोधाचं समर्थन करणार आहोत. आम्हीही आमचा आवाज उचलणार आहोत. सरकारनं आमचं म्हणणं ऐकून घ्यायला हवं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करू’ असंही बिल्किस बानो यांनी ‘म्हटलं.

सोमवारपासून बिल्किस बानो यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. व्हिडिओमध्ये शाहीनबाग दादी एका आंदोलनस्थळी उपस्थित असल्याचं दिसत होतं. व्हिडिओच्या माध्यमातून बिल्किस बानो यांनी शेतकरी आंदोलनस्थळी जाऊन त्यांची विचारपूस केल्याचा दावा केला जात होता.

उल्लेखनीय म्हणजे, केंद्रानं विरोधकांचा विरोध डावलत विधेयकाद्वारे संमत केलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येतंय. या आंदोलक शेतकऱ्यांना देश-विदेशातूनही पाठिंबा व्यक्त होतोय. पंजाब-हरयाणाशी संबंधित अनेक सेलिब्रिटिंनीही शेतकऱ्यांना आपला पाठिंबा व्यक्त केलाय. तर काही जण सक्रीयरित्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

२०२० मध्ये सर्वात प्रभावशाली ठरलेल्या १०० व्यक्तींच्या यादीत बिल्किस बानो यांच्या नावाचाही समावेश होता. . त्या कडाक्याच्या थंडीतही दिल्लीतल्या आंदोलनस्थळी ठाण मांडून बसलेल्या दिसल्या तसंच आंदोलनात सहभागी झालेल्या नागरिकांच्या आवाजही त्या बनल्या होत्या.

बिल्किस बानो या उत्तर प्रदेशातील बुलंदशहरच्या रहिवासी आहेत. सध्या त्या आपल्या मुलांसोबत दिल्लीतच राहत आहेत. त्यांचे दिवंगत पती शेतात मजुरी करत होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधी आंदोलनात सहभागी होण्यापूर्वी बिल्किस बानो यांनी आपल्या आयुष्यात कोणत्याही राजकीय आंदोलनात सक्रीय सहभाग घेतला नव्हता. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य गृहिणी म्हणूनच व्यतीत केलं.

Protected Content