४३ लाखांचे भेसळयुक्त अन्नपदार्थ जप्त

ठाणे : वृत्तसंस्था । अन्न आणि औषध प्रशासनाने दोन महिन्यांत कोकण विभागात ‘फेस्टिव्हल ड्राइव्ह’मध्ये मावा, खवा, तेलासह ४२ लाख ९४ हजार रुपयांचा भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त केला आहे. चाचणीसाठी २५९ नमुनेही घेतले असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

सण, उत्सवाच्या काळात अन्न आणि औषध प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जाते. सणामध्ये विविध अन्नपदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. अशावेळी अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. भेसळीचा प्रकार असल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येत असून चाचणीसाठी अन्न पदार्थांचे नमुनेही घेतले जात आहेत.

एफडीएच्या कोकण विभागाने गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी फेस्टिव्हल ड्राइव्हला सुरुवात केली होती. मिठाईचे ३६ नमुने घेण्यात आल्याची माहिती सह आयुक्त (अन्न) शिवाजी देसाई यांनी दिली. इतर पदार्थांचा एक लाख ६६ हजार ७२० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १५४ नमुनेही घेण्यात आले आहेत.

अन्नपदार्थांचे नमुने घेतल्यानंतर ते तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवले जातात. मात्र, प्रयोगशाळेत नमुने तपासणीची प्रक्रिया अत्यंत संथ असल्याने अनेकदा बरेच दिवस अहवाल मिळत नाही. परिणामी संबंधितांवर पुढची कारवाई करता येत नाही. फेस्टिव्हल ड्राइव्हमध्ये दोन महिन्यांत २५९ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. परंतु यापैकी २३६ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.

Protected Content