२५ वर्षीय महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना दिला जन्म !

 

 

 

 

मोरोक्को ( माली ) : वृत्तसंस्था । आफ्रिका खंडातील माली या छोट्या देशातील एका महिलेने मोरक्को येथील रुग्णालयामध्ये एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला असून सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचं माली सरकारने सांगितलं आहे.

 

मात्र एकाच वेळी या महिलेने नऊ बाळांना जन्म कसा दिला यासंदर्भातील संशोधन आणि इतर माहिती अद्याप सरकारने गोळा केलेली नाही असं म्हटलं आहे.

 

माली सरकारने २५ वर्षीय हालीमा सिसी या महिलेला चांगल्या आरोग्य सुविधा मिळावल्यात म्हणून पश्चिम आफ्रिकेतील तिच्या मूळ शहरामधून मोरक्कोमधील एका चांगल्या रुग्णालयामध्ये ३० मार्च रोजी दाखल केलं होतं. सुरुवातीच्या चाचण्यांमध्ये ही महिला सात बाळांना जन्म देईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. एकाच वेळी सात बाळांना जन्म देणं ही खूपच दुर्मिळ घटना आहे. मात्र नऊ बाळांना एकाच वेळी जन्म देणं दुर्मिळात दुर्मिळ घटना आहे.

 

मोरक्कोचे आरोग्यमंत्री रिचर्ड कोऊधारी यांनी आपल्याला यासंदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं म्हटलं आहे. मात्र मालीच्या आरोग्य मंत्र्यांनी दिलेल्या माहितीमध्ये या महिलेने पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला असून सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसुती करण्यात आल्याचं सांगितलं आहे. “ही महिला आणि बाळांची प्रकृती ठणठणीत आहे,” असं मालीच्या आरोग्यमंत्री  फॅण्टा सीबे यांनी सांगितलं आहे. या महिलेसोबत गेलेल्या मालीमधील डॉक्टरांकडून आपण तिच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती घेत असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. काही आठवड्यांनंतर ही महिला आणि बाळं मायदेशी परततील असं सांगण्यात आलं आहे.

 

डॉक्टर हालीमाच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत असून या मुलांच्या प्रकृतीवरही डॉक्टर बारीक नजर ठेऊन आहेत. ही सर्व बाळं वाचतील की नाही यासंदर्भात आताच काही सांगणं घाईचं ठरेल असं सांगितलं जात आहे. माली आणि मोरक्कोमध्ये करण्यात आलेल्या अल्ट्रासाऊण्ड चाचण्यामध्ये या महिलेच्या पोटात सात गर्भ आढळून आल्याचं मालीच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. आरोग्यमंत्र्यांनी हालीमाचं अभिनंदन करत डॉक्टरांचंही कौतुक केलं आहे.

Protected Content