२२ लाखांचं बक्षिस असलेल्या चार जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

 

 

गडचिरोली : वृत्तसंस्था ।  भामरागड एरिया कमांडर दयाराम नैताम (३५), याच्यासह  सुखालुराम मडावी (३५), निला कुमरे (३४),गोविंदा आतला (२६) या चार जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलीससमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनी दिली. या नक्षलवाद्यांवर २२ लाखांचे बक्षिस होते.

 

 

यात एका महिला नक्षलीचाही समावेश आहे. दोन वर्षात ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याने नक्षल चळवळीचे कंबरडे मोडले आहे.

 

पोलीस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गोयल यांनी याबाबत माहिती दिली. आत्मसमर्पण योजना, चकमकीत नक्षलवाद्यांचा झालेला खात्मा तसेच हिंसाचाराला कंटाळून नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचं त्यांनी सांगितलं. यात तीन पुरूष व एक महिलेचा समावेश आहे. दयाराम नैताम हा डिसेंबर २००६ मध्ये टिपागड दलममध्ये भरती झाला. २००७ मध्ये त्याची बदली होवून भामरागड दलममध्ये कार्यरत होता. त्याची एसीएम पदावर पदोन्नती झाली. २०२१ मध्ये कमांडर म्हणून पदोन्नती मिळाली. त्याच्यावर चकमकीचे ११ गुन्हे, खूनाचे ६ गुन्हे व जाळपोळीचे ३ गुन्हे दाखल असून  ८ लाख रूपयांचे बक्षिस होते.  सुखालुराम मडावी हा २००६ मध्ये टिपागड मध्ये दलम सदस्य म्हणून भरती झाला. २००६ मध्ये तो उपकमांडर झाला. एप्रिल २००७ मध्ये नक्षल सदस्य निला कुमरे हिच्यासोबत त्याचे लग्न झाले. त्याच्यावर चकमकीचे ९ गुन्हे, ४ खुनाचे गुन्हे, जाळपोळीचे ५ गुन्हे तर भुसुरूंग स्फोटाचा १ गुन्हा दाखल असून ८ लाख रूपये बक्षिस शासनाने ठेवले होते.  निला  कुमरे ही कसनसूर दलममध्ये भरती झाली होती. उपकमांडर नकुल मडावीसोबत लग्न झाल्यानंतर कसनसूर दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर चकमकीचे ३ गुन्हे, खूनाचे ३ गुन्हे, जाळपोळीचे ४ गुन्हे असून शासनाने २ लाख रूपयांचे बक्षीस तिच्यावर ठेवले होते. गोविंदा आतला हा चातगाव दलम मध्ये सदस्य म्हणून भरती झाला. २०१९ मध्ये पीपीसीएम पदावर पदोन्नती होवून २०२० मध्ये झोन टिडीला पीपीसीएम पदावर कार्यरत होता. त्याच्यावर चकमकीचे ६ गुन्हे, खूनाचे २ गुन्हे दाखल असून शासनाने ४ लाख रूपयांचे बक्षिस ठेवले होते. आदिवासी भागातील जनतेकडून नक्षलवाद्यांना मिळणारा अल्प प्रतिसाद, नक्षलवादी लहान मुलाचा छळ करून नक्षली कारवायांसाठी करून घेत असलेला वापर, आप्तेष्ठापासून लांब रहात असल्याची खंत या सर्वांना कंटाळून नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाची वाट निवडल्याचं गोयल यांनी सांगितलं.

 

२०१९ ते २१ या दोन वर्षांत एकूण ३७ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. यात ४ डिव्हीसी, २ दलम कमांडर, २ दलम उपकमांडर, २८ सदस्य व १ जनमिलीशिया यांचा समावेश आहे.

Protected Content