मुंबई प्रतिनिधी । अशोक चव्हाण यांनी महाआघाडीच्या सरकारला मल्टीस्टारर चित्रपट संबोधल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी हा चित्रपट चालणार असल्याची ग्वाही दिली आहे.
याबाबत वृत्त असे की, प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलतांना सार्वजनीक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांनी महाविकास आघाडीचे सरकार हे मल्टी स्टारर चित्रपट असल्याचे सांगितले होते. यावर आज मुंबईत ना. थोरात यांनी चव्हाण हे नेमके काय बोलले याची माहिती आपल्याला नसली तरी हा चित्रपट चालणार असल्याचा आशावाद व्यक्त केला. आमचे सरकार हे जनहितासाठी आवश्यक असणार्या कॉमन मिनीमम प्रोग्रॅमवर चालणारे असून आम्ही पाच वर्षाचा कालखंड आनंदात पूर्ण करू असे ते म्हणाले.
दरम्यान, ना. बाळासाहेब थोरात यांनी याप्रसंगी माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात त्यांनी काम केले नसले तरी जाहिराती मात्र चांगल्या केल्या होत्या. यामुळे आज ते विरोधात असतांना उपोषण करत आहेत. आम्ही मराठवाड्याच्या हितासाठी काम करू असे ते म्हणाले. दरम्यान, मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान चांगली भूमिका घेतली होती. आतादेखील ते आपली भूमिका बदलवणार नसल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर राज्यातील नऊ हजार ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त निवडणुकीच्या ठरावाबाबतची माहिती आपल्याकडे आलेली नसून याची माहिती घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल असे ना. थोरात म्हणाले.