हिंदू मुलाचं मुस्लिम मुलीशी लग्न, धर्मांतर होईपर्यंत विवाह अमान्य; कोर्टाचा निर्णय

 

 

चंदीगड: वृत्तसंस्था । पंजाब आणि हरियाणाच्या उच्च न्यायालयाने  मुस्लिम मुलीने हिंदू मुलाशी विवाह केला असला तरी मुलीने धर्मांतर केल्याशिवाय हा विवाह वैध ठरणार नाही. विवाह वैध ठरवण्यासाठी मुलीला धर्मांतर करावे लागेल, असं म्हटलं आहे.

 

दोघेही सहमतीने एकत्र राहू शकतात, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

 

एका 18 वर्षीय मुस्लिम तरुणी आणि 25 वर्षीय हिंदू तरुणाच्या याचिकेवर पंजाब-हरियाणा कोर्टात सुनावणी सुरू होती. यावेळी हा निर्णय देण्यात आला. या दोघांनीही नुकतंच हिंदू मंदिरात लग्न केलं आहे. मात्र, मुलीने हिंदू धर्म स्वीकारल्याशिवाय हा विवाह मान्य होणार नाही. परंतु, दोघंही वयस्क असल्याने सहमतीने राहू शकतात, असं कोर्टाने म्हटलं आहे.

 

 

15 जानेवारी रोजी एका शिव मंदिरात दोघांनीही हिंदू पद्धतीने विवाह केला होता. या विवाहानंतर दोन्ही कुटुंबाकडून धमकी मिळाल्याने त्यांनी सुरक्षेसाठी कोर्टात अर्ज केला होता. आम्ही अंबालाच्या एसपीकडे सुरक्षेची मागणी केली होती. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही मदत न मिळाल्याने आम्हाला कोर्टात यावं लागल्याचं या दोघांनी कोर्टाला सांगितलं. आमच्याकडे कोर्टात येण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता. त्यानंतर कोर्टाने अंबालाच्या एसपीला या दोघांनाही तात्काळ सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले.

 

यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाने मर्जीने विवाह करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला होता. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश एस. सुजाता सचिन शंकर यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला होात. दोन व्यक्तिंच्या नात्याच्या स्वातंत्र्याचं जात किवा धर्माच्या कारणाने कोणीही हनन करू शकत नाही. आपल्या मनाप्रमाणे विवाह करण्याचा अधिकार संविधानात दिलेल्या मूलभूत अधिकारात समाविष्ट आहे, असं कर्नाटक कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलं होतं. सॉफ्टवेअर इंजीनियर वाजिद खान यांच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने हा निर्णय दिला होता. वाजिद खान नावाच्या व्यक्तीसोबतच्या संबंधांना आपले कुटुंबीय विरोध करत असल्याचा आरोप रम्या नावाच्या एका महिलेने केला होता. आमच्या नात्याला विरोध करून कुटुंबीयांकडून आमच्या स्वातंत्र्याचं हनन केलं जात आहे, असा दावा या महिलेने केला होता. तर, या दोघांच्या विवाहाला आमची परवानगी आहे. पण रम्याच्या घरच्यांकडून या विवाहाला परवानगी मिळत नसल्याचं वाजिदच्या आईने म्हटलं होतं. त्यावर ते दोघंही आपला व्यक्तीगत निर्णय घेण्यास सक्षम असल्याचा निर्णय कोर्टाने दिला होता

Protected Content