मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास एनआयएकडे द्या”, ठाणे सत्र न्यायालयाचा एटीएसला आदेश!

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । “मनसुख हिरेन  हत्याकांडाचा  तपास थांबवा आणि  तपास  एनआयएकडे हस्तांतरीत करा”, असे निर्देश ठाणे स्तर न्यायालयानं एटीएसला दिले आहेत!

 

मनसुख हिरेन हत्याकांड  तपासावरून राज्यात एनआयए विरुद्ध एटीएस असा अघोषित सामना सुरू झाल्याचं चित्र दिसू लागलं होतं. तपास हाती घेण्याचे निर्देश एनआयएनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आणले असून देखील एटीएसनं तपास एनआयएकडे सोपवला नव्हता. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या निर्देशांनंतर देखील एटीएसनं  दोन आरोपींना अटक केली  मंगळवारी  पत्रकार परिषद देखील घेतली होती. अखेर ठाण्यातील सत्र न्यायालयानेच एटीएसला या प्रकरणाचा तपास थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

 

 

केंद्रीय गृहमंत्रालयाने आदेश देऊन देखील महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण हस्तांतरीत करत नसल्याची तक्रार एनआयएनं ठाणे सत्र न्यायालयात केली होती. एनआयएची ही तक्रार मान्य करत सत्र न्यायालयाने एटीएसला हे आदेश दिले आहेत.

 

महत्त्वाची कडी ठरलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएनं याआधीच अँटिलियाबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्यांच्या प्रकरणात अटक केली आहे. आता मनसुख हिरेन प्रकरण देखील एनआयएकडे आल्यामुळे या दोन्ही प्रकरणांवर सचिन वाझेंची चौकशी करण्याचा मार्ग एनआयएसाठी मोकळा झाला आहे. मंगळवारी एटीएसनं पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंनीच विनायक शिंदे या पॅरोलवरील आरोपीचा वापर करून गुन्ह्यामध्ये सहभाग ठेवल्याचं स्पष्ट केलं होतं. वाझेंच्या सांगण्यावरूनच विनायक शिंदेने गुन्ह्यात वापरलेली सिमकार्ड खरेदी करून ती इतरांना दिली होती. त्यानुसार या प्रकरणात अजून काहींनी अटक होण्याची शक्यता आहे, असं देखील एटीएसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Protected Content