हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व : ना. गुलाबराव पाटील

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आपल्या आजवरच्या वाटचालीत हिंदुत्व हाच आधारभूत विचार राहिलेला असून याच राष्ट्रीयत्वाच्या विचारावर आपली वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

 

यावल तालुक्यातील कोसगाव येथे सत्कारासह विकासकामांच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील यांचे कोसगावात अतिशय भव्य स्वागत करण्यात आले. तर कोसगाव ते पाडळसे या गावाच्या डांबरीकरणासह गावात व्यायामशाळेला निधी देण्याची घोषणा ना. पाटील यांनी याप्रसंगी केली. राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे आज यावल तालुक्यातील कोसगाव येथे अतिशय भव्य स्वागत करण्यात आले. गुलाब फुलांचा मोठा हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. तर त्यांची गावातून सवाद्य मिरवणूक काढली असता मोठया संख्येने महिलांनी ना. गुलाबराव पाटील यांचे औक्षण केले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खासदार रक्षाताई खडसे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती हिरालाल पाटील, विलास चौधरी, माजी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती हर्षल पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती पल्लवी चौधरी, रावेर भाजप मोर्चा रेखा बोंडे, माजी सरपंच चंपालाल पाटील, माजी जि.प. सभापती रवींद्र पाटील, लक्ष्मी मोरे, विजय मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य भरत महाजन व सविता भालेराव, यांच्यासह कोसगाव येथील ग्रामस्थ उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे बहारदार  सूत्रसंचालन निर्मल चतुर सर यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून माजी बाजार समिती सभापती हिरालाल पाटील यांनी  ना. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सहकार्याबाबत आभार व्यक्त केले. कोसगाव ते पाडळसे हा रस्ता खराब असून यासाठी निधी द्यावा, तसेच गावात व्यायामशाळेला निधी देण्याची मागणी त्यांनी केली. ना. गुलाबराव पाटील यांनी याला तात्काळ होकार दिला.

खासदार रक्षाताई खडसे आणि आमदार राजूमामा भोळे यांनी आपल्या मनोगतात कोसगाव येथील पदाधिकार्‍यांच्या विकासाभिमुख वाटचालीचे कौतुक करून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिले.

ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणातून कोसगावकरांनी केलेल्या अभूतपूर्व स्वागताबाबत आभार व्यक्त केले. कोसगावमधील बरेचसे ग्रामस्थ हे बाहेरगावी गेले असून त्यांनी नोकरीसह उद्योग, व्यापारात नाव कमावले असल्याचे देखील गुलाबभाऊ म्हणाले.  दरम्यान, ना. पाटील म्हणाले की, हिंदुत्व म्हणजे हेच राष्ट्रीयत्व होय. आम्ही शिवसेनेचे खरे वैचारीक वारसदार आहोत. आता भाजप सोबत युती केल्यामुळे आम्ही आमच्या मूळ घरी आलो असल्याची भावना ना. पाटील यांनी व्यक्त केली.

ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आम्ही आजवर जे काही मिळवलेय ते खूप कष्ट आणि संघर्ष करून मिळविले आहे. १९९२ च्या दंगलीत आमच्यावर अनेक गुन्हे  दाखल झाले. यानंतरही शेकडो केसेस दाखल झाल्या. याची जबर किंमत मोजावी लागली. पक्षाने आम्हाला खूप काही दिले. मात्र यासाठी आम्ही सुध्दा आमचे आयुष्य अर्पण केल्याचे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

विलास चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. याप्रसंगी गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

Protected Content