मुंबई: वृत्तसंस्था । मायानगरी मुंबईत क्राइम ब्रँचच्या पथकाने हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. पोलिसांनी एका अभिनेत्याला अटक केली आहे. तर टीव्ही मालिकांमध्ये काम करणाऱ्या तीन अभिनेत्रींची सुटका केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देहविक्रेयच्या व्यवसायावर परिणाम झाला. आता पुन्हा हॉटेलसह सर्व सेवा सुरू झाल्या आहेत. त्यानंतर देहव्यापाराशी संबंधित लोक यात परतले आहेत. दहिसर क्राइम ब्रँचने शुक्रवारी एक हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त केले. यात काही टीव्ही अभिनेत्रींचाही समावेश होता.
डीसीपी अकबर पठाण यांना याबाबत खबऱ्यांमार्फत माहिती मिळाली होती. त्यांनी दहिसर क्राइम ब्रँचचे वरिष्ठ निरीक्षक महेश तावडे यांच्याकडे जबाबदारी सोपवली. तपास सुरू केला असता, या रॅकेटशी संबंधित एका महिलेचा क्रमांक मिळाला. त्यांनी लगेच बोगस ग्राहकाला तिच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. तिने तीन मुलींचे फोटो पाठवले. त्यातील दोघींनी हिंदी आणि पंजाबी टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. तर तिसरी मुलगी ही बॅले डान्सर आहे. तिने अनेक प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांत काम केले होते.
रॅकेटशी संबंधित मुलीने तिन्ही अभिनेत्रींसाठी पैसे ठरवले. तर कमिशन म्हणून साडेचार लाख रुपये सांगितले. हॉटेल ग्राहकाला बुक करावे लागेल, असेही सांगितले. त्यावर ग्राहकाने तयारी केली. ग्राहकाने चौघांना गोरेगावच्या एका हॉटेलबाहेर बोलावले. क्राइम ब्रँचच्या पथकाने ठरल्याप्रमाणे सापळा रचला आणि चौघांनाही ताब्यात घेतले. संबंधित मुलीला अटक करण्यात आली आहे. तर अभिनेत्रींची सुटका केली.