जळगाव : प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या हवामानावर आधारित फळ पीक विम्याची जिल्ह्यातील शेतकर्यांची गेल्या अनेक महिन्यांपासून बाकी असलेली ८ कोटी ६३ लाख रूपयांची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली आहे.
पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील , खासदार रक्षाताई खडसे व जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत याबाबतचे निर्देश देऊन पाठपुरावा केल्याने शेतकर्यांना यांच्या हक्काची रक्कम मिळाली आहे.
हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना २०१९-२० च्या अंतर्गत जिल्ह्यात आजवर २८८ कोटी ७९ लाख रूपयांची भरपाईची रक्कम शेतकर्यांना मिळालेली आहे. यानंतर वादळी वारे आणि गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना ७४ कोटी ५१ लाख रूपयांची भरपाई देखील मिळाली होती. तथापि, यातील वादळी वारे व गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना मात्र अद्यापही विम्याची रक्कम मिळालेली नव्हती. यासाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.
हवामान आधारित पीक विम्यासाठी आधार क्रमांक नसणे, सर्व्हे क्रमांक चुकीचा असणे, आधार कार्डवरील नावे न जुळणे आदी कारणे देऊन विमा कंपन्यांनी शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ केली होती. या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी या बैठकीत विमा कंपन्यांना दणका देऊन हा प्रश्न जून अखेरपर्यंत मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. याची कंपन्यांनी तातडीने दखल घेत जिल्ह्यातील शेतकर्यांना ८ कोटी ६३ लाख इतकी नुकसान भरपाईची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा केली आहे. याबाबत ऍग्रीकल्चरल इन्शुरन्स कंपनीने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकार्यांना पत्राद्वारे याबाबतची माहिती कळविली आहे.