यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील गोरगरीबांना मिळणारा स्वस्त धान्य दुकानावरून होणारा धान्याचा पुरवठा कपात करण्याचा निर्णय हातावर पोट भरणाऱ्या मजुर वर्गावर अन्याय करणारा व त्यांच्या कुटुबावर उपासमारीची वेळ आणणारा असून शासनाने धान्य कपातीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी निवेदनाव्दारे निळे निशान संघटनेच्या वतीने तहसीलदार यांना करण्यात आली आहे.
या संदर्भात दिलेल्या निवेदनात निळे निशान सामाजीक संघटनेने म्हटले आहे की, “यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात मोलमजुरी करून आपल्या पोटाची खळगी भरणारे मजूर वर्ग असून त्यांना शासनाच्या वतीने मिळणारे स्वस्त धान्य मिळणे हे गरजेचे व अतिशय आवश्यक आहे. परंतु असे असतांना राज्य शासनाने स्वस्त धान्य कपात करून गोरगरीब नागरीकांवर व त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आणलेली आहे. त्या करिता शासनाने घेतलेले स्वस्त धान्य कपातीचे निर्णय तात्काळ मागे घ्यावे, तसेच यावल तालुक्यातील बेघर भूमिहीन नागरीकांना तात्काळ ग्रामपंचायतीने रहिवास प्रयोजनार्थ जागा उपलब्ध करून किवा गोरगरीव गरजू कुटुंब ज्या ठीकाणी वास्तव्यास असतील त्या जागा नियमित करून ग्रामपंचायतच्या नमुना नं. ८ ला नोंद करण्यात यावीत, निळे निशान या संघटनेव्दारे करण्यात आलेल्या मागण्या या जनहिताच्या असून तात्काळ आपण मार्गी लावून गोरगरिवांना न्याय द्यावे अन्यथा संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदनात म्हटले आहे.
यावल तहसीलचे नायब तहसीलदार आर डी पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनावर निळे निशान संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक तायडे, युवराज सोनवर्णे (जिल्हा अध्यक्ष, रोजगार आघाडी जळगाव), विनायक साळुंके (जिल्हा कार्यअध्यक्ष), विलास भास्कर (यावल तालुका अध्यक्ष), संजय तायडे (यावल-रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख), लक्ष्मीबाई तायडे (महीला आघाडी), भीमराव गजरे (यावल शहर अध्यक्ष), राहुल तायडे (उपतालुका अध्यक्ष), भूषण सपकाळे (शाखा प्रमुख) शे.सखावत शे.सिकंदर (तालुका संघटक ), तुषार तायडे (अट्रावल), सुभाष तायडे ( ग्राम पंचायत सदस्य अट्रावल) यांच्या स्वाक्षरी आहे .