इंग्रजी माध्यमाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी प्रयत्न करावेत : ना.गुलाबराव पाटील

जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सध्या मराठी शाळांसमोर इंग्रजी माध्यमाचे मोठा आव्हान उभे ठाकले आहे. यातच जिल्हा परिषद शाळांना नव्या युगाच्या आव्हानाशी जुळवून घेतांना अडचणी येत आहेत. यामुळे शिक्षकांनी दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून याला तोंड देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

तालुक्यातील चिंचोली येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दोन नवीन खोल्यांचे लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. दरम्यान, जिल्ह्यात यंदा तब्बल १०८ नवीन शाळा खोल्या उभारण्यात आल्या असून यापुढे देखील याच गतीने कामे होतील अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी मंजूर झालेल्या चिंचोली येथील शाळा खोल्यांचे लोकार्पण आज ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. ना. पाटील यांचे गावात आगमन होताच त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या शाळेत आगमन होण्याआधी ना. पाटील यांच्या हस्ते गावात दोन ठिकाणी पेव्हर ब्लॉकच्या कामांचे उदघाटन झाले. यानंतर त्यांच्या हस्ते शाळा खोल्यांचे लोकार्पण झाले.

. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, तालुका प्रमुख राजेंद्र चव्हाण, पंचायत समिती सभापतीपती जनाआप्पा पाटील, बाजार समितीचे सभापती कैलास चौधरी, नगरसेवक गणेश सोनवणे, मनोज चौधरी, शाम कोगटा, युवासेनेचे शिवराज पाटील, अनिल भोळे, पं.स. सदस्य नंदलाल पाटील, संचालक बाजार समिती पंकज पाटील, केंद्रप्रमुख अनिता परमार, मुख्याध्यापक परमान तडवी, पी.आय. प्रताप शिकारे, सरपंच शरद घुगे, अतुल घुगे, चेतन पोळ, जितू पोळ, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, शिक्षकवृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. केंद्रप्रमुख अनिता परमार यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळाखोल्यांचे काम पूर्ण झाल्याबद्दल पालकमंत्र्यांचे आभार मानले. ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, सध्या मराठी शाळांसमोर आव्हाने असून जि.प. शाळांना तर अजूनच खूप मोठी आव्हाने आहेत. इंग्रजी भाषा आवश्यक असली तरी त्यातूनच शिक्षण घेतले पाहिजे असे नाही. मराठी माध्यमाची मुलेदेखील खूप पुढे जातात. मात्र यासाठी त्यांना चांगल्या शिक्षणाच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. यासाठी आम्ही जिल्हा परिषद शाळांच्या बळकटीकरणाला प्राधान्य दिले आहे. यात पालकमंत्री संरक्षण भिंत योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो शाळांना वॉल कंपाऊंड करण्यात आले आहेत. तर जिल्ह्यात गत वर्षात सुमारे १०८ नवीन शाळा खोल्या बांधण्यात आल्या असून हा विक्रम आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या जळगाव पॅटर्नचे कौतुक केले असून भविष्यातही याच प्रकारे काम करण्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली. आपण दरवर्षी जळगाव ग्रामीण मतदारसंघात एक लाख वह्या देत असतो. यंदा देखील सव्वा लाख वह्या देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि. प.शाळेचे मुख्याध्यापक परमान तडवी यांनी केले. तर, आभार सरपंच शरद घुगे यांनी मानले.

Protected Content