मुंबई वृत्तसंस्था । मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत सात मोठे निर्णय घेण्यात आले आहे. यात मुदत संपलेल्या व कोरोना विषाणू संक्रमणामुळे निवडणुका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात अध्यादेश काढण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी ५ रुपये करण्यास मान्यता दिली आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी मार्च महिन्यापर्यंत 5 रुपयांत पुरवण्याचा निर्णय झाला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी कांदा उत्पादकांशी चर्चा करुन तोडगा काढतील, अशी माहितीही भुजबळ यांनी प्रसारमध्यांना दिली. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषीमंत्री दादा भुसे आणि नाशिकमधील कांदा उत्पादक, शेतकऱ्यांची चर्चा सुरु आहे. यावेळी कांदा उत्पादकांकडून साठवणुकीवरील मर्यादा हटवण्याची मागणी करण्यात आली. यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय
- मुदत संपलेल्या व कोरोना विषाणू संक्रमणामुळे निवडणूका न झालेल्या नागरी स्थानिक संस्थांमध्ये नियुक्त प्रशासकांचा कालावधी वाढविणार असून अध्यादेश काढण्यास मान्यता देण्यात आली आहे.
- शिवभोजन थाळीचा दर १ ऑक्टोबर २०२० पासून पुढील ६ महिन्यांसाठी ५ रुपये करण्यास मान्यता.
- सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील विद्युत शाखेचे बळकटीकरण करणार
- राज्यातील रायगड जिल्ह्यात प्रस्तावित बल्क ड्रग पार्क व औरंगाबाद ऑरिक सिटी येथे वैद्यकीय उपकरण पार्क प्रकल्पाकरिता विशेष प्रोत्साहने देण्यास मान्यता.
- राज्यातील सर्व माजी सैनिक व त्यांच्या घरपट्टी व मालमत्ता कर माफ करण्यासाठी मा बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना
- धारावी पुनर्विकास प्रकल्पाची सध्या सुरू असलेली निविदा प्रक्रिया रद्द, नव्याने निविदा मागविणार
- मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकार इमारतींच्या जलद पुनर्विकासकरिता नव्याने मार्गदर्शक सूचना जाहीर