सोलापूर (वृत्तसंस्था) जात पडताळणीत समितीने सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर महाराज यांचा जातीचा दाखला बनावट असल्याचे म्हटले आहे. तसेच समितीने त्यांचा जातीचा दाखला देखील रद्द केला आहे. यामुळे आता सोलापूरात पोटनिवडणूक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोलापूर लोकसभेचे खासदार डॉ जयसिदेश्वर शिवाचार्य यांनी आपल्या उमेदवारी अर्जसोबत दाखल केलेल्या बेड जंगम अर्जावर प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कुंदकरे यांनी आक्षेप घेत खासदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार जात प्रमाणपत्रावरील सुनावणी 15 फेब्रुवारीला पूर्ण झाली होती. या सुनावणीत खासदारांच्या वकिलामार्फत सादर करण्यात आलेले 12 अर्ज समितीने फेटाळून लावले होते. तर तक्रारदारांनी सादर केलेला साक्षीदार पडताळणीचा अर्जही समितीने फेटाळला होता. दरम्यान जात पडताळणी समितीने सांगूनही महास्वामींच्या ज्या मूळकागदपत्राबाबत तक्रादाराने आक्षेप घेतला होता, ती कागदपत्रे सादर करण्यात आली नाहीत. त्यामुळेच समितीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, डॉ . जयसिदेश्वर महास्वामींच्या जातीच्या दाखल्यासंर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल करत असताना, मूळ कागदपत्रे जोडली आहेत, त्यामुळे जात पडताळणी समितीसमोर सादर करता आली नसल्याचे डॉ . जयसिदेश्वर महाराजांच्या वकिलांचे म्हणणे आहे. या निर्णयामुळे त्यामुळे आता सोलापूरमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे.