पाचोरा प्रतिनिधी । देशाची सेवा करण्यासाठी कसरत करुन सैन्यात भरती होण्याचे स्वप्न रंगविणाऱ्या युवकांना ६० लाख रुपयांचा चुना लावुन आरोपी पसार झाले आहेत. सदर घटनेमुळे हताश झालेल्या नगरदेवळा येथील पिडीत तरुणाने पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हा गुन्हा जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी नगरदेवळा ता. पाचोरा येथील रविंद्र पाटील, समाधान निकुंभ, शुभम शेलार, राहुल जाधव, प्रविण महाजन, प्रविण माळी, परमेश्वर महाजन, स्वप्निल पाटील हे युवक गावानजिकच सैन्य दलात भरती होण्यासाठी कसरत करीत असतांना गावातीलच रमेश ईश्र्वर बागुल हे हसीम सैफुद्दीन सैय्यद रा. शहदनगर (हैदराबाद) व राकेश शर्मा रा. सिकंदराबाद (तेलंगणा) यांना घेवुन आले. आम्हाला विश्वासात घेऊन सदर आरोपींनी सैन्य दलात भरती करुन देण्याचे आमिष दाखवत प्रत्येकी ३ लाख ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यांचेवर विश्र्वास ठेवत आमच्या सह महाराष्ट्रातील नाशिक, मुंबई, जळगांव जिल्ह्यातील २० ते २५ युवकांनी सदर आरोपींच्या बॅंक खात्यात सुमारे ६० लाख रुपये जमा केले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आरोपींना पिडीत युवकांनी संपर्क केला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत नेहमीच वेळ मारुन नेत होते. यात आपली फसवणूक झाल्याचे समजताच नगरदेवळा येथील रविंद्र नारायण पाटील वय – २८ या युवकाने दि. २२ रोजी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत रमेश ईश्र्वर बागुल, हसीम सैफुद्दीन सैय्यद व राकेश शर्मा यांचे विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असुन घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांचे आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखा, जळगांव यांचेकडे वर्ग करण्यात आला आहे. या फसवणुकीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.