सेट परीक्षा डिसेंबरमध्ये होण्याची चिन्हे

पुणे वृत्तसंस्था । सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) डिसेंबरमध्ये होण्याची चिन्हे आहेत. कोरोना प्रादुर्भाव, अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये आणि नवीन शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे सेट परीक्षा डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यात सेट परीक्षा घेतली जाते. ती नियोजित वेळापत्रकानुसार २८ जून रोजी होणार होती. त्यासाठी जवळपास सव्वालाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. मात्र, कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलली. अद्यापपर्यंत सेट परीक्षेची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे सेट परीक्षा कधी होणार, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून होत आहे.

राज्यात सर्व विद्यापीठे अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीत आहेत. परीक्षा ऑक्‍टोबर महिन्यात होत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे आदेश दिले. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये ‘यूपीएससी’च्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे सेट परीक्षेच्या केंद्रासाठी महाविद्यालये डिसेंबर महिन्यात उपलब्ध होतील. सेट परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुणे विद्यापीठाला सेट परीक्षा याच महिन्यात घ्यायची होती. मात्र, नेटची परीक्षा झाल्यानंतर सेट परीक्षा घेतल्यास योग्य ठरेल, अशी विद्यापीठाची भूमिका होती. सद्य:स्थितीत ऑफलाइन परीक्षेच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. सेट परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन याचा निर्णय अद्याप ठरलेला नाही, असेही सेट विभागाने स्पष्ट केले.

Protected Content