सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत : शिवसेनेने कानडी उपमुख्यमंत्र्यांना सुनावले

 

मुंबई वृत्तसंस्था ।सूर्य-चंद्र असेपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहील,फफ अशी अरेरावीचे भाषा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी आज करीत आहेत. त्यांनी एक लक्षात घ्यावे, सूर्य-चंद्र महाराष्ट्रासही तेजाने प्रकाशमान करीत असतात. आचार्य अत्रे यांच्याच भाषेत सांगायचे तर सूर्य-चंद्र तुमच्या बापाचे नोकर नाहीत.याद राखा! सूर्य-चंद्राच्याच साक्षीने कर्नाटकातून तुमची अरेरावी नष्ट होईल व मराठी बांधवांचा लढा यशस्वी होईल असे खडे बोल शिवसेनेने लक्ष्मण सवदींना सुनावले आहेत.

काल बेळगाव येथे कानडी सरकारने मराठी भाषिकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला. यावर शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, एखाद्या राज्याचा स्थापना दिवस हा पवित्र, मंगलमय दिवस असतो. त्या दिवसाला गालबोट लागू नये हे आमचेही मत आहेच, पण गेल्या साठेक वर्षांत मराठी माणूस, भाषा, संस्कृतीवर जे निर्घृण हल्ले तेथे सुरू आहेत त्याचाच हा उद्रेक असतो. कर्नाटक व महाराष्ट्राचे व्यक्तिगत भांडण असण्याचे कारण नाही. एक बेळगावचा वाद सोडला तर दोन राज्यांतील सामाजिक, सांस्कृतिक, व्यापारी नाते इतर राज्यांपेक्षा घट्ट आहे; पण कर्नाटक त्याच्या हद्दीतील २० लाख मराठी बांधवांशी ज्या निर्घृणपणे वागत आहे तो प्रकार संतापजनक आहे.

यात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील नेते कितीही ओरडत असले तरी जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत तोपर्यंत बेळगाव कर्नाटकातच राहणार असल्याची आरोळी तेथील उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी ठोकली आहे. हा जो कोणी लक्ष्मण सवदी गोधडीत रांगत होता त्याआधीपासून २० लाख मराठी बांधव महाराष्ट्रात येण्यासाठी संघर्ष करीत आहेत. सध्या बेळगावचा तिढा सर्वोच्च न्यायालयात लटकला आहे. त्यामुळे आता न्यायालयच काय ते ठरवेल. सूर्य-चंद्र आकाशात आहेत की नाहीत हे पाहून सर्वोच्च न्यायालय बेळगावप्रश्‍नी निकाल देणार नाही आणि सूर्य-चंद्र हे काही कुणाच्या बापाचे नोकर नाहीत. भाषावार प्रांतरचना केल्यावर मराठी भाषिकांना त्यांच्या हक्काच्या राज्यात जाण्याचा अधिकार का नाकारला गेला? २० लाख मराठी भाषिकांचा आक्रोश, किंकाळ्या, सांडलेले रक्त आणि बलिदानाची पर्वा न करता निव्वळ दडपशाही मार्गाने मराठी भावना चिरडून त्यांना कानडी मुलखात कोंबले हा अन्याय नाही का? असा सवाल यात विचारण्यात आला आहे.

या अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रातही लाखो कानडी बांधव आपले उद्योग-व्यवसाय करीत सुखाने राहत आहेत हे लक्ष्मण सवदीसारख्या मंत्र्याने विसरू नये. बेळगावातील भगवे झेंडे उतरवून ते पायदळी तुडवले जातात, छत्रपती शिवरायांचे पुतळे रातोरात उखडले जातात, मराठी भाषेतले फलक तोडले जातात हा मोगलाईचाच प्रकार आहे. कर्नाटकात भाजपचे राज्य आहे व त्या राज्यात मराठी बांधवांवर अत्याचार सुरू असतील तर महाराष्ट्रातील भाजप पुढार्‍यांचे मन अश्रूंनी भिजलेच पाहिजे. तसे का झाले नाही हे त्यांनाच माहीत. नाही म्हणायला चंद्रकांतदादा पाटलांनी बेळगावसह मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात यायलाच हवीत, असे म्हटल्याचे प्रसिद्ध झाले आहे. त्याबद्दल पाटलांचे आभार! महाराष्ट्राची बांधिलकी बेळगावसह संपूर्ण सीमा बांधवांशी असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.

Protected Content