जळगाव, -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | साहित्य लिखाण आणि वाचनाने मनुष्याला जगण्याचं बळ मिळतं, साहित्यामुळे माणसाची सर्वसमावेशक प्रगती होते असे प्रतिपादन कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. संभाजी देसाई यांनी केले.
सुर्योदय सर्व समावेशक मंडळाच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त दि. ६ मार्च रोजी दिलासा व्यसनमुक्ती केंद्राच्या हाॅलमध्ये आयोजित कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. देसाई बोलत होते. या कार्यक्रमाला डॉ. अ. फ. भालेराव, कवी प्रकाश पाटील, दिलासा संस्थेचे सुधीर वसाने, अंजली पाटील प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
मंडळाचे शहराध्यक्ष साहेबराव पाटील व संचालक विनोद निळे यांनी प्रमुख अतिथींचे शाल श्रीफळ देऊन स्वागत केले. साहेबराव पाटील यांनी प्रास्ताविकात सुर्योदय सर्व समावेशक मंडळाच्या कार्याची तसेच आगामी अखिल भारतीय सुर्योदय साहीत्य संमेलनाची माहिती दिली. या कवी संमेलनात डॉ. अ. फ. भालेराव (माय), प्रकाश पाटील ( आई), अशोक पारधे (आचरणात आणायचं राहुन गेलं), आर. जे. सुरवाडे (संक्रांत), रमजान तडवी (मोबाईल), अंजली पाटील (तुझं जगणं), अॅड. सुकन्या महाले(निषेध), साहेबराव पाटील (या व्यसनामुळे), विशाल वाघमारे (आखरी पन्ना), संदीप साळुंखे (अफूची शेती) अशा बहारदार कविता सादर झाल्या. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अॅड. सुकन्या महाले यांनी तर आभार प्रदर्शन साहेबराव पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी मंडळाचे विनोद निळे, राजू वाघ, हेमराज राऊत यांनी परिश्रम घेतले.