सुभाष चौकातून महिलेचे ७२ हजाराचे दागिने लांबविले; रिक्षा चालक अटकेत

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुभाष चौकात खरेदीसाठी आलेल्या महिलचे ७२ हजार रूपयांचे दागिने रिक्षा चालकास इतर अज्ञात दोन महिलांनी लंपास केल्याची घटना गुरूवारी सायंकाळी बोहरागल्ली ते राधाकृष्ण मंगल कार्यालय दरम्यान घडली. याप्रकरणी रिक्षा चालकास अटक केली असून न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे.

अधिक माहिती अशी की, मनिषा ज्ञानेश्वर शिंदे (वय-४८, रा. मेहरूण) ह्या कुटुंबियांसोबत गुरूवारी १२ नोव्हेंबर रोजी बाजारात वस्तू खरेदी आणि सोन्याच्या दागिन्यांना दुरूस्ती करण्यासाठी दुपारी ३ वाजता शहरातील सुभाष चौकात आल्या होत्या. भाजीपाला खरेदी केल्यानंतर त्यांनी दुरूस्तीसाठी टाकलेले दागिने दुकानातून घेतले. त्यानंतर घरी परतण्यासाठी त्या दुपारी ४ वाजेच्या सुमारास बिलाल चौकात जाण्यासाठी बोहरा गल्लीजवळ रिक्षात बसल्या. आधीच रिक्षामध्ये दोन महिला प्रवासी होत्या. त्यातील एक महिला खाली उतरली व तिने मनिषा यांना मध्ये बसण्यास सांगितले. त्यानुसार त्या दोन्ही महिलांच्या मध्ये बसल्या.

बोहरा गल्लीतून रिक्षा मेहरूणच्या दिशेने निघाली. दरम्यान, राधाकृष्ण मंगल कार्यालयाजवळ चालकाने रिक्षा थांबविली. नंतर मनिषा शिंदे यांना खाली उतरविले व मी या दोन महिलांना सोडून येतो. तुम्ही इथेच थांबा सांगून चालक प्रवासी भाडे न घेता रिक्षा घेवून तेथून निघून गेला. बराच वेळ होवूनही रिक्षा येत नसल्यामुळे अखेर मनिषा यांनी दुसऱ्‍या रिक्षाने घर गाठले.

मनिषा शिंदे ह्या घरी पोहोचल्यावर त्यांनी त्यांची पर्स तपासली. त्यावेळी त्यांना २८ हजार ८०० रूपये किंमतीचे सोन्याचे काप व ४३ हजार २०० रूपये किंमतीचे सोन्याचे कामाचे झुमके गायब झालेले दिसले. त्यांनी पर्समध्ये शोध घेतला. मात्र, मिळून न आल्याने रिक्षात बसलेले असताना ते कुणीतरी चोरून घेतले असल्याची खात्री त्यांना झाली. अखेर मनिषा शिंदे यांच्या फिर्यादीरून अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल होताच, पोलिसांना रिक्षाचालक व त्यातील प्रवासी महिलांवर संशय बळावला. त्या दिशेने पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. रस्त्यांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये रिक्षाचा क्रमांक मिळून आला. अखेर रिक्षाचालक सैय्यद हुसेन सैय्यद हसन (२८, रा.पिंप्राळा-हुडको) पोलिसांनी अटक केली. तसेच रिक्षाही जप्त केली असून सैय्यद हुसेन याला शुक्रवारी दुपारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले होते. याप्रकरणातील इतर व्यक्तींचाही पोलीस शोध घेत आहेत.

Protected Content