सुभाषवाडी येथे घरातून रोकडसह सोन्याच्या दागिन्यांची चोरी; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सुभाषवाडी येथील शेतमजूराच्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी करून रोकडसह सोने चांदीचे दागिने असा एकुण ८४ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे २२ रोजी दुपारी उघडकीला आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील सुभाष वाडी येथील गोविंद भावलाल राठोड (वय-३८) हे आपल्या पत्नी, दोन मुली व मुलासोबत राहतात. शेतात मजूरीचे काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गोविंदा राठोड हे पत्नीसोबत रोजंदारीवर शेतात कापुस वेचण्याच्या कामाला गेले होते. मुलगी प्रतिक्षा ही शाळेत गेली होती तर दुसरी मुलगी पायल व मुलगा आशिष हे दुपारी घराला कडी लावून त्याचे काका सुकलाल मनराम राठोड यांच्याकडे अभ्यास करण्यासाठी गेले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराची कडी उघडून घरातील लोखंडीपेटीचे कुलूप तोडून पेटीतील ४० हजार रूपये किंमतीचे ३५ भार चांदीच्या पाटल्या, २० हजार रूपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची अंगठी, ४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे मणी आणि २० हजार रूपये रोकड असा एकुण ८४ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दुपारी घरात चोरी झाल्याचे मुलगी पायल हिच्या लक्षात आले. याप्रकरणी गोविंद राठोड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि विशाल सोनवणे करीत आहे. 

Protected Content