मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आज पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौर्यावर येत असतांना खासदार संजय राऊत यांनी त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौर्यावर येत असून यावर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. तर आज प्रसारमाध्यमांशी बोलतांना खासदार संजय राऊत यांनी देखील या दौर्याला लक्ष्य केले. ते म्हणाले की, मोदींनी बेळगावसह सीमाभागात सुरू असलेल्या अत्याचारांबाबत तिथल्या मुख्यमंत्र्यांना सूचना देऊन त्याबाबत महाराष्ट्रात घोषणा करावी. ‘यापुढे बेळगावातील मराठी बांधवांवर अत्याचार करू नका अशा सूचना मी दिल्या आहेत’ असं मोदींनी जाहीर करावं. त्याचा आम्हाला आनंद होईल, असं राऊत यावेळी म्हणाले.
दरम्यान, संजय राऊत पुढे म्हणाले की, खरंतर राहुल गांधी महाराष्ट्रात आले, तेव्हा त्या यात्रेत आदित्य ठाकरे सहभागी झाले. आता शेवटच्या टप्प्यात मी जातोय. हे अखंड भारताचं स्वप्न आहे. भारत काश्मीर ते कन्याकुमारी एक आहे आणि अखंड हिंदुस्थानावर शिवसेनेची पावलं उमटायला हवीत. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत आम्ही यात्रेत सहभागी होतो, असं राऊत म्हणाले.