खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडे यांच्या अस्वस्थतेतून भूकंपाची वात पेटू नये ; शिवसेनेचा भाजपला सूचक इशारा

मुंबई (वृत्तसंस्था) सध्या भाजपात खडसे, पंकजा, बावनकुळे, तावडे अशा मंडळींची अस्वस्थ तगमग, तळमळ सुरू आहे. त्या तगमगीतून एखाद्या नव्या भूकंपाची वात पेटू नये म्हणून विरोधी पक्षाने सावध राहायला हवे,’ असा इशारा शिवसेनेने भाजपला दिला आहे.

 

शिवसेनेने विरोधकांवर सामनाच्या संपादकीयमधून टीका केली आहे. अग्रलेखात म्हटले आहे की, विरोधकांनी अनेक अडथळे व अडचणी निर्माण केल्या तरीही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे सरकार अडचणीत आणण्यासाठी राजकीय दाबदबावाचे जंतरमंतर करू पाहणारेच परागंदा झाले आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदास कोणताही धोका नाही (तसा तो कधीच नव्हता) आणि राज्यातील महाविकास आघाडीसही इजा पोहोचणार नाही. विरोधकांचे सगळे अघोरी प्रयोग त्यांच्यावरच उलटले आहेत. चंद्रकांतदादा अशी काही उलथापालथ घडवू पाहत असतील तर तो त्यांचा राजकीय हक्क आहे. पण आता करोनाचे संकट आहे. ते गेल्यावर त्यांनी सरकार पाडण्यासाठी करवत, हातोडे, विळे, कोयते वगैरे घेऊन कामास लागावे. मात्र, विरोधक ठाकरे सरकार खिळखिळे करण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे हे सरकार मजबूत आणि गतिमान होईल. महाविकास आघाडीचे सरकार स्वत:च्या पायावर मजबुतीने आत्मनिर्भर झाले आहे. त्याच आत्मनिर्भरतेचा मार्ग विरोधी पक्षाने स्वीकारावा,’ असा सल्ला देण्यात आला आहे. पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीतला अजित पवारांचा खिळा या मंडळींनी काढला, पण तोच खिळा आज सरकारला मजबुती देत आहे. विरोधक ठाकरे सरकार खिळखिळे करण्याचा जेवढा प्रयत्न करतील तेवढे हे सरकार मजबूत आणि गतिमान होईल,असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.

Protected Content