सावद्यात गजानन हॉस्पिटलमध्ये अज्ञात व्यक्तींद्वारा दगडफेक

 

सावदा, प्रतिनिधी । येथील रावेर रोड वरील स्वामींनारायण नगर भागातील गजानन हॉस्पिटलचे अज्ञात व्यक्तींनी शुक्रवार दि .२३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता दगडफेक व टॉमीने तोड – फोड करीत लाखो रुपयांचे नुकसान केले. या घटनेमुळे हॉस्पिटलमधील रुग्ण व कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्मण झाले होते. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, डॉ .सुनील चौधरी हे शुक्रवार दि.२३ ऑक्टोबर रोजी नेहमीप्रमाणे गजानन हॉस्पिटल येथे रुग्ण तपासणी करत होते. यावेळी सकाळी १० वाजता इम्रान शेख ( वय -२८ ) नामक रुग्ण कुठल्यातरी प्राण्याच्या दंशामुळे गंभीर झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. त्यावेळी डॉ.सुनील चौधरी यांनी त्याला तपासले असता त्याचे हृदय व फुफ्फुस काम करीत नसल्याचे प्रथमदर्शनी दिसत होते. त्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी मोठ्या दवाखान्यात नेण्याचा सल्ला त्यांनी असता नातेवाईकांनी रुग्णाला तेथून जळगाव येथे नेत असता रुग्णाची रस्त्यातच प्राणज्योत मावळली. काही वेळाने ११.३० वाजता काही एक कारण नसतांना अज्ञात चार तरुण दवाखान्याजवळ आले. त्यांनी हातातील टॉमी तसेच मोठे दगड हॉस्पिटलवर फेकले त्यात त्यांनी दरवाजा, खिडक्या तसेच स्वागत कक्षाचे काउंटरच्या टेबलावरील काचा फोडून प्रचंड नुकसान केले. त्यांना याचा जाब विचारण्याचा प्रयत्न डॉ. सुनील चौधरी यांचे भाऊ अनिल चौधरी यांनी केला मात्र , त्यांनी त्यांचा हात पिरगळून शिवीगाळ केली. तसेच रुग्णालयातील टेलिव्हिजन सेटची तोड – फोड केली . यामुळे रुग्णालयातील कर्मचारी , इतर रुग्ण हे भयभीत झाले. अचानक काय घडले हे कोणालाच काही कळले नाही. डॉ. सुनील चौधरी यांनी सावदा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थली दाखल झाले त्यामुळे अजून होणार अनर्थ टळला. संध्याकाळी ६ वाजता सावदा पोलीस स्टेशनच्या आवारात रावेर यावल तालुक्यातील सर्व डॉक्टर एकत्रित येऊन संध्याकाळी सात वाजता पोलीस ठाण्यात मध्ये आले. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना निवेदन दिले यावेळी डॉ. सुनील चौधरी, डॉ. गुलाबराव पाटील, व्ही. जे. वारके,डॉ. अजित पाटील, डॉ. कुंदनलाल चौधरी, डॉ. शैलेश खाचणे सह ४५ डॉक्टर उपस्थित होते.
रात्री उशिरा पर्यंत गुन्हा नोंदण्याचे काम सुरू होते.

Protected Content