मुंबई : वृत्तसंस्था । भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईत हलवण्यात आलंय. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते, मात्र आता त्यांना मुंबईतील कोकिळा बेन रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे
प्रज्ञा सिंह मागील अनेक दिवसांपासून बऱ्याच आजारांनी त्रस्त आहेत. त्यामुळेच खबरदारी म्हणून त्यांना मुंबईत हलवण्यात येत आहे.
प्रज्ञा सिंह यांची प्रकृती अचानक बिघडली. शुक्रवारी सायंकाळी त्यांचा रक्तदाब अचानक वाढला. अनेक प्रयत्न करुनही रक्तदाब कमी झाला नाही. आज तर त्यांना श्वास घेण्यासही त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिळाबेन रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. चार्टर्ड प्लेनने त्यांना मुंबईत आणण्यात आलं. डिसेंबरमध्ये कोरोना संसर्गानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
साध्वी प्रज्ञा सिंह मध्यप्रदेशातील भोपाळ येथून खासदार आहेत. त्यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी गंभीर आरोप आहेत. सध्या या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. त्यांच्या विरोधात मुंबईतील सेशन कोर्टात खटला सुरू आहे.
साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी याआधी अनेक वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्यं केलेली आहेत. मला खोट्या खटल्यात फसवलेल्या हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारुन माझं सूतक संपवलं, असं चीड आणणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञा यांनी केलं होतं. हेमंत करकरेंनी मला चुकीच्या पद्धतीने खटल्यात अडकवलं. त्यामुळे त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळालं, असं साध्वी म्हणाल्या होत्या. प्रज्ञा सिंहच्या या जाहीर वक्तव्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली होती.