…मग त्यांनी शरद पवारांना का सोडले नाही ? : गुलाबभाऊ गरजले

गुवाहाटी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उध्दव ठाकरे यांनी आमदारांना सोडले, त्यांनी वर्षा निवासस्थान देखील सोडले मात्र ते शरद पवार यांना का सोडत नाही ? असा सवाल पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केला. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्यांचे लक्ष्य बनलेल्या गुलाबभाऊंनी आज एकनाथ शिंदे यांच्या गटासमोर बोलतांना जोरदार हल्लाबोल केला.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे शिवसेनेच्या निष्ठांबाबतची आधीची भाषणे दाखवून शिवसेने नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तर सोशल मीडियात देखील यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. आजवर ते प्रसारमाध्यमांच्या समोर आले नव्हते. मात्र आज त्यांचा व्हिडीओ हा एकनाथ शिंदे यांच्या गटातर्फे जारी करण्यात आला आहे.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी गुवाहाटीत बंडखोर आमदारांना संबोधीत करतांना जोरदार भाषण केले. ते म्हणाले की, शिवसेनेने आमच्यासाठी खूप काही केले हे खरे आहे. आम्हाला सर्व काही बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मिळाले. मात्र ८० टक्के हे पक्षाचे असले तरी २० टक्के आमचेही परिश्रम आहेत. आम्ही घरावर तुळशीपत्र ठेवून पक्षाचे काम केले आहे. १९९२ मधील दंगलीत आपण स्वत: भाऊ आणि वडलांसह तुरूंगात होतो. तेव्हा संजय राऊत कुठे होते हे माहीत नाही. संजय राऊत यांनी ४७ डिग्रीच्या उन्हाळ्यात दिवसाला ३५ लग्नांना हजेरी लावून दाखवावी. त्यांना कार्यकर्त्यांच्या सर्व समस्या सोडवून दाखवाव्यात मग आपण मानू. मात्र फक्त बाळासाहेबांचा फोटो लाऊन आपण शक्तीमान असल्याचे सांगणे हे चुकीचे आहे.

ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी थेट उध्दव ठाकरे यांच्यावर देखील टिका केली. ते म्हणाले की, त्यांनी पक्षाच्या ३९ आमदारांना सोडले, वर्षा बंगला देखील सोडला. मात्र ते शरद पवार यांना सोडायला का तयार नाहीत हे अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले. आमच्या विरोधात टीका करण्यात आली. आमच्यावर चिखलफेक झाली. मात्र मतदारसंघातून आमच्या बाजूने सुध्दा लोक उभे राहत आहेत. एकनाथ शिंदे यांनी संघर्ष सुरू केला असून आपण सर्व त्यांच्या पाठीशी असल्याचे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

Protected Content