जळगाव प्रतिनिधी । रेल्वेत नोकरी लावून देतो असे म्हणून जळगाव शहरातील सम्राट कॉलनीतील तरुणीची सात लाख रुपयात फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात एमआयडीसी पोलिसांनी संशयित आकाश मनोहर पाटील रा. वडगाव ता. रावेर यास अटक केली आहे.
सम्राट कॉलनीतील योगीता खैरनार यांची मुलगी वर्षा हिने कला शाखेची पदवी पुर्ण केली आहे. ती सुशिक्षीत बेरोजगार असल्याने नोकरीच्या शोधात होती. यादरम्यान आकाश याने खैरनार कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. तसेच वडील रेल्वेत टी.सी.आहेत असे म्हणून वर्षा खैरनार हिस रेल्वे नोकरी लावून देतो असे सांगत आकाशसह त्याच वडील मनोहर पाटील या दोघांनी 2018 मध्ये खैरनार कुटुंबियांकडून वेळावेळी पैशांची मागणी करत सात लाख रुपये उकळले होते. त्यानंतर ही मुलीस नोकरी लागली नाही. पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी योगिता खैरनार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचे तपासअधिकारी सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, योगेश बारी यांच्या कर्मचार्यांनी संशयित आकाश पाटील यास शुक्रवारी अटक केली. या गुन्ह्यात संशयित असलेले आकाशचे वडील फरार असून त्यांचाही शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.