रस्त्यात अचानक कुत्रा आल्याने दुचाकी घसरली; दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव भुसावळ रोडवर असलेल्या दूरदर्शन टॉवरनजीक रस्त्यात अचानक कुत्रा आला.त्यात दुचाकी घसरून पडल्याने दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणी बुधवार १९ जुलै रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. रवींद्र परशुराम वराडे (वय-५५) रा. कुऱ्हे पानाचे ता.भुसावळ असे मयत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, रवींद्र वराडे हे आपल्या पत्नी प्रतिभा वराडे यांच्यासोबत भुसावळ तालुक्यातील कोरे पानाचे येथे वास्तव्याला आहे. ११ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रवींद्र वराडे हे दुचाकी (एमएच १९ एएच ६१०४) ने पत्नी प्रतिभा वराडे यांच्यासोबत जळगावकडून भुसावळकडे जाण्यासाठी निघाले रस्त्यातील दूरदर्शन टॉवरनजीक अचानक दुचाकी समोर कुत्रा आल्याने त्यांची दुचाकीवरील ताबा सुटला. या अपघातात पती-पत्नी खाली कोसळले, यात रवींद्र वराडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने नजीकच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसाच्या उपचार दरम्यान १३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांची पत्नी देखील गंभीर जखमी झाल्या होत्या. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक फौजदार राजेंद्र उगले करीत आहे.

Protected Content