मुंबई प्रतिनिधी । असंख्य भाविक नव वर्षाचे स्वागत देवस्थानी दर्शन घेऊन करत असल्याने वणी येथील सप्तश्रुंगी गड आणि शिर्डी येथील साई देवस्थानाने ३१ डिसेंबरला २४ तास मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
नववर्षाच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबरला साई मंदिर सुरु ठेवण्याची मागणी साई भक्तांकडून करण्यात येत होती. त्यानुसार राज्य सरकारच्या नियमांचं पालन करत ३१ डिसेंबरच्या रात्रीही मंदिर सुरु ठेवण्याचा निर्णय साई संस्थानकडून घेण्यात आला आहे. साई संस्थानच्या या निर्णयामुळे नववर्षाच्या सुरुवातीला जास्तीत जास्त भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार आहे. तथापि, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित भाविकांनाच दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी प्रवेशद्वारावर बॅरिकेटिंग करण्यात आलंय. तर मंदिरात प्रवेश घेऊ न शकणार्या भाविकांसाठी खास एलईडीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, वणी येथील सप्तश्रुंगी देवस्थानानेही ३१ डिसेंबरला २४ तास देवस्थान सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार असल्याचे देवस्थानाने जाहीर केले आहे.