सर्वसामान्यांचे आधारवड- ना. बाळासाहेब थोरात

thorat bramhane

राज्याचे महसूलमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांचा आज जन्मदिवस. यानिमित्त त्यांच्या कार्यावर हा विशेष ब्लॉग लिहलाय पक्षाच्या अल्पसंख्यांक आघाडीचे सरचिटणीस संजय ब्राम्हणे यांनी !

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम कोटी-कोटी शुभेच्छा. आज राज्य सरकारमधील महत्वाच्या मंत्र्यांपैकी एक असणारे आमचे साहेब म्हणजे कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा अफलातून संगम आहे. यासोबत संयम आणि शालीनता असणारे साहेब हे राज्याच्या राजकारणात याच मुळे इतरांपासून वेगळे मानले जातात. खरं तर राजकारणात प्रचंड आक्रमकता आवश्यक असते. तथापि, संयमीपणा दाखवूनही जनसेवेचे अविरत व्रत कसे सहजसाध्य होऊ शकते याचे सर्वात मोठे उदाहरण हे अर्थातच ना. बाळासाहेब थोरात होय. त्यांच्या सर्वसमावेशक आणि संयमी नेतृत्व कौशल्यामुळे आज काँग्रेस पक्षा राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाल्याची बाब कुणी नाकारणार नाही. खरं तर सत्ता स्थापनेच्या स्फोटक कालखंडात काँग्रेसची बाजू ही विलक्षण नेटाने लाऊन धरण्याचे शिवधनुष्य त्यांनी अगदी सहजपणे पेलून धरल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर महसूलसारख्या अतिशय महत्वाच्या खात्याची धुरा सांभाळतांना त्यांच्यातील अतिशय कुशल नेतृत्वाची चुणूक पुन्हा एकदा महाराष्ट्र अनुभवत आहे.

आज राज्य विधानसभेचा विचार केला असता, अ‍ॅड. के. सी. पाडवी यांचा अपवाद वगळता ना. बाळासाहेब थोरात यांच्या इतका ज्येष्ठ नेता सभागृहात कुणीही नाही. १९८५ पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघातून अव्याहतपणे निवडून येणार्‍या साहेबांनी राज्याच्या राजकारणात आपल्या कार्यकौशल्याची अमिट छाप उमटवली आहे. यासोबत राष्ट्रीय पातळीवर एक विश्‍वासार्ह नेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. राज्य मंत्रिमंडळात पाटबंधारे, कृषी, जलसंधारण, खारजमीन, शिक्षण, राजशिष्टाचार, रोहयो व महसूल अशी आठ खाते सांभाळलेले अजातशत्रू व अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होय.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जनसेवेचा वारसा साहेबांनी अतिशय समर्थपणे पुढे चालविला आहे. सर्वांगीण विकास कसा असू शकतो याचे सर्वात साकार स्वरूप हे संगमनेर मतदारसंघाचे होय. या शहरासह तालुक्याच्या तळागाळात विकासाला पोहचवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. या तालुक्यातील सहकारी संस्थांचे जाळे पाहून तर कुणीही अक्षरश: थक्क होते. तर अलीकडेच संगमनेर हे एज्युकेशन हब म्हणून ख्यात झाल्याची बाबदेखील विसरता येणार नाही. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते आमदारकीपर्यंत सर्व पदे काँग्रेसकडे असणार्‍या संगमनेरचे हे कार्यकुशल नेतृत्व आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीला लाभले असून यातूनच पक्षाला पुन्हा एकदा उर्जीतावस्था मिळाल्याचे दिसून येत आहे. आमच्यासारख्या असंख्य काँग्रेस जनांचे आधारस्तंभ असणारे ना. बाळासाहेब थोरात यांना दीर्घायू लाभो आणि त्यांच्या हातून जनतेची सेवा घडो आणि अर्थातच ते काँग्रेसच्या प्रगतीरथाचे सारथी बनो हीच परमेश्‍वर चरणी प्रार्थना.

संजय पंडित ब्राम्हणे
प्रदेश सरचिटणीस
काँग्रेस अल्पसंख्यांक आघाडी

Protected Content