Home Cities जळगाव पंडित नेहरू पुतळ्याखालील ‘अदाणी’ नाव हटवा; माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांची मागणी

पंडित नेहरू पुतळ्याखालील ‘अदाणी’ नाव हटवा; माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांची मागणी


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।   शहरातील चौक आणि रस्त्यांच्या सुशोभीकरणाच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करत माजी नगरसेवक अशोक लाडवंजारी यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याखाली लावण्यात आलेले ‘अदाणी सिमेंट’ कंपनीचे नाव तत्काळ हटविण्याची मागणी त्यांनी मनपा आयुक्तांकडे केली असून, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

जळगाव शहर मनपा प्रशासनाने प्रशासन काळात चौक व रस्ते सुशोभीकरणाच्या नावाखाली काही व्यावसायिक कंपन्यांशी हातमिळवणी करून स्वतःचे आर्थिक हित साधल्याचा आरोप लाडवंजारी यांनी केला आहे. या प्रक्रियेमध्ये महापालिकेचे आर्थिक नुकसान झाले असून संबंधित कंपन्यांना मोठा फायदा झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेषतः पंडित जवाहरलाल नेहरू पुतळ्यापासून रेल्वे स्टेशनपर्यंत तसेच गोविंदा रिक्षा स्टॉप ते नटवर सिनेमा थिएटरपर्यंतच्या रस्ते विभाजक आणि चौक सुशोभीकरणाचे काम ओरिएंट कंपनी अर्थात अदाणी सिमेंट कंपनीला तब्बल वीस वर्षांसाठी देण्यात आल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे.

अल्प खर्चात काम करून संबंधित कंपनीने शहरातील विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मनपा करारानुसार केवळ रस्ते विभाजक आणि चौकांचे सुशोभीकरण तसेच मर्यादित जाहिरात फलक लावण्यास परवानगी असताना कंपनीने मनमानी पद्धतीने संपूर्ण परिसरावर वर्चस्व गाजविल्याचा आरोप करण्यात आला आहे. “मनपाने जणू संपूर्ण रस्ते आंदण दिल्यासारखे आणि कंपनीने ते विकत घेतल्यासारखे वर्तन सुरू आहे,” अशी टीका लाडवंजारी यांनी केली.

याशिवाय, नेहरू पुतळ्याजवळील सर्कल लहान करण्यात आल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघातांची शक्यता वाढल्याचेही त्यांनी नमूद केले. वाहतूक व्यवस्थेचा विचार न करता करण्यात आलेल्या बदलांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुतळ्याखाली कंपनीचे नाव असलेला दगडी फलक बसविण्यात आल्याने पुतळ्याचे विद्रूपीकरण झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.

पंडित नेहरू यांच्या पुतळा उभारणीत कंपनीचे कोणतेही योगदान नसताना त्या ठिकाणी व्यावसायिक जाहिरात करणे अयोग्य असल्याचे सांगत संबंधित दगडी फलक तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा अशोक लाडवंजारी यांच्यासह सुनिल भैय्या माळी, राजु मोरे, किरण  राजपूत, मजहरभाई पठाण, रिकू चौधरी, सुहास चौधरी, भल्ला तडवी आणि रहिम तडवी यांनी दिला आहे.

एकूणच, जळगाव शहरातील सुशोभीकरण प्रकल्प आणि त्यामधील खासगी कंपन्यांचा हस्तक्षेप हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला असून, पंडित नेहरू पुतळ्यावरील जाहिरातीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आता मनपा प्रशासन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Protected Content

Play sound