सर्वपक्षीय एकोप्यामुळेच ‘मसाका’ला तूर्तास जीवदान

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील न्हावी शिवारातल्या मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीला स्थगिती मिळाली असून यासाठी सर्वपक्षीय एकतेची वज्रमूठ कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे.

अतिशय उज्वल परंपरा असणारा मधुकर सहकारी साखर कारखाना म्हणजेच मसाका अडचणीत आल्याने सुमारे तीन वर्षांपासून बंद आहे. अनेकदा कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात आले असले तरी याला यश मिळाले नाही. यातच राज्यातील आकस्मिक सत्तांतर आणि अडीच वर्षांनी पुन्हा सत्ताबदल झाल्याचा फटका मधुकर सहकारी कारखान्याला बसला. जिल्हा बँकेचे कारखान्याकडे कर्ज असले तरी पहिल्यांदा कर्मचार्‍यांची देणी आणि ऊस उत्पादकांची थकबाकी मिळाल्याशिवाय विक्री करण्यात येऊ नये अशी मागण असतांनाही जिल्हा बँकेने निविदा प्रक्रिया राबवून याची विक्री केली. तथापि, यात अनेक प्रकारचा संशयकल्लोळ असल्याचा आरोप कर्मचारी आणि शेतकर्‍यांनी केला. यातून आंदोलन उभारण्यात आले. अखेर याच आंदोलनाला यश लाभल्याने सहकारमंत्र्यांनी याच्या विक्री प्रक्रियेला स्थगिती मिळाली आहे.

आमदार राजूमामा भोळे यांनी विधानसभेत प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर याला स्थगिती देण्यात आली. तथापि, मसाकाच्या आंदोलनास सर्वपक्षीय नेते आणि पदाधिकार्‍यांनी पाठींबा दिल्याची बाब विसरता येणार नाही. कामगारांच्या आंदोलनात सर्व पक्षांचे नेते सहभागी झाले. यामुळे मोठा दबाव तयार झाला. यातूनच आमदार राजूमामा भोळे यांनी प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर सहकारमंत्र्यांना तातडीने विक्री प्रक्रियेला स्थगिती द्यावी लागली. हा सर्वपक्षीय एकोप्याचा विजय मानावा लागणार आहे.

दरम्यान, मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या अस्तित्वासाठी आता पुढील दिशा ही नेमकी काय असेल यावर बरेच काही अवलंबून आहे. राज्य शासनाकडून मदतीचा हात येऊन कारखाना पुन्हा सुरू होण्याची शक्यता धुसर असली तरी यासाठी सर्वपक्षीय एकोपा आवश्यक असल्याचे दिसून येत आहे. तूर्तास सर्वांच्या एकोप्यामुळे मसाकाला जीवदान मिळाले आहे हे नाकारता येणार नाही.

Protected Content