मुंबई प्रतिनिधी । राज्य सरकारला जनतेच्या कोणत्याही समस्यांचे निराकरण करता आले नसून अनेक प्रलंबीत प्रश्न असल्याने सरकार अधिवेशनापासून पळ काढत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. अधिवेशनाआधी पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. अधिवेशन होऊ नये, झालं तर कमीत कमी दिवस व्हावं. त्याही दरम्यान कुठलीही चर्चा होऊ नये. अशा प्रकारची रणनिती या सरकारने बनवली आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषेदतून केली.
तसेच, “राज्याचं तथाकथित अर्थसंकल्पीय अधिवेशन हे उद्या सुरू होतं आहे. मी तथाकथित यासाठी म्हटलं की, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या इतिहासातील सगळ्यात लहान व पूर्णपणे कामकाजापासून पळ काढणारं अधिवेशन हे उद्यापासून सुरू होत आहे.” असं देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं.
यावेळी त्यांनी पूजा चव्हाण प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीकाही केली. राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. ते रोखण्यासाठी सरकारने शक्ती कायदा आणला आहे. पण राज्यातील मंत्रीच या अत्याचारात सहभागी आहेत. सत्ता पक्षाच्या लोकांना लैंगिक स्वैराचार करण्याची मुभा नव्या कायद्याने दिली आहे का? ही कोणती शक्ती आहे? सामान्यांना एक न्याय आणि इतरांना वेगळा न्याय असं काही आहे का? असा सवाल करतानाच राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर शक्ती कायद्याच्या संयुक्त समितीतून भाजपचे सर्व आमदार राजीनामा देतील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. हा कायदा म्हणजे एक प्रकारचा फार्स आहे. मंत्र्यांचा राजीनामाच होत असेल तर या समितीत उपस्थित राहून काय फायदा? असा सवालही त्यांनी केला आहे.