जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे आले पाहिजे. समाजाचे ऋण फेडायची ही संधी रक्तदानामुळे मिळते. शासकीय रुग्णालयात दाखल गोरगरीब, गरजू रुग्णांना मोफत रक्तपुरवठा केला जातो. उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवू नये म्हणून आजच्या शिवजयंतीच्या पावन दिवसापासून सर्वानी शासकीय रुग्णालयात रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. या शिवकार्यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत होणार आहे, असे आवाहन राज्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केले.
राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागातर्फे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महारक्तदान अभियानाची सुरुवात विभागाचे मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. प्रसंगी मंचावर वैद्यकीय शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. अजय चंदनवाले, आ. सुरेश भोळे, आ. किशोर दराडे, आ.चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी अमन मित्तल, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील उपस्थित होते. सुरुवातीला महारक्तदान अभियानाची सुरुवात ना. महाजन यांच्या हस्ते फित कापून करण्यात आली. प्रसंगी रुग्णालयातील रक्तपेढीचा त्यांनी आढावा घेतला.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ना. गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून राज्यभरात महारक्तदान अभियानाची हि सुरुवात झाली. यासह विविध व्याधींवर उपचार व जनजागृती अभियानाला देखील सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमात देवी धन्वंतरी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी माल्यार्पण केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.
प्रस्तावनेतून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी महारक्तदान अभियान शिबिराविषयी माहिती देऊन अधिकाधिक रक्तसंकलन करण्याविषयी प्रयत्नरत राहणार असल्याचे सांगितले. डॉ. अजय चंदनवाले यांनी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे राज्यभरातील नियोजन सांगून सर्व वयोगटातील नागरिकांनी रक्तदानाकरिता पुढे येण्याबाबत आवाहन केले.
शिबिरामध्ये रक्तदान केलेले रक्तदात्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात ना. महाजन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रथम टप्प्यात ३० जणांनी रक्तदान केले. वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. महाजन यांनी सांगितले की, रक्तदानामुळे अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या शस्त्रक्रियेमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत, अपघातग्रस्त रुग्णाला, प्रसूतीच्या वेळी अनियंत्रित रक्तस्त्राव झाल्यास रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.आता सगळे मिळून मानवहितार्थ कार्य करू या, चला आपण सगळेजण रक्तदान करू या, असेही मार्गदर्शन ना. गिरीश महाजन यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी तर आभार डॉ. ज्योती बागुल यांनी केले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख, डॉक्टर्स, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
महाविद्यालय व रुग्णालयाचा घेतला आढावा
ना. गिरीश महाजन यांनी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांचेकडून कार्यक्रमाच्या आधी महाविद्यालय व रुग्णालयाचा आढावा घेतला. अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. प्रसंगी त्यांनी अधिष्ठाता, डॉक्टर्स व अधिकाऱ्यांशी संवाद साधला. महाविद्यालयातील मनुष्यबळ आणि सोयीसुविधांविषयी त्यांनी माहिती घेतली.