समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी भाजपालाही पाठिंबा देईल– मायावती

लखनऊ : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या ‘एमएलसी’ निवडणुकी अगोदर बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायवती यांनी एक मोठं विधान केलं आहे. समाजवादी पार्टीला हरवण्यासाठी गरज पडल्यास बसपा भाजपा किंवा अन्य कोणत्याही पक्षाला पाठिंबा देईल. असं मायावती यांनी म्हटलं आहे.

समाजवादी पार्टीच्या दलित विरोधी कार्यांविरोधातील आमची कठोर भूमिका दाखवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. असं बसपा प्रमुख मायावती यांनी स्पष्ट केलं आहे.

राज्यसभा निवडणुकीत बसपाचे उमेदवार प्रकाश बजाज यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला होता. त्यांनी समाजवादी पार्टीचे रामजी गौतम यांच्याविरूद्ध उमेदवारी दाखल केली होती. बसपा उमेदवारांचा अर्ज रद्द झाल्यानंतर बसपाच्या काही आमदारांनी सपाचे नेते अखिलेश यादव यांची भेट घेतली होती. या भेटीवर मायावती चांगल्याच संतापल्या होत्या.

”विधान परिषद निवडणुकीत बसपा जशास तसे उत्तर देण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावेल. एकवेळ भाजपाला मत देऊ वा इतर पक्षाला, पण विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टीच्या उमेदवारांचा पराभव करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू. आमच्या सात आमदारांना फोडलं गेलं. ही गोष्ट समाजवादी पार्टीला महागात पडेल,” असा इशारा मायावती यांनी दिला होता.

Protected Content