सफाई कर्मचार्‍याचा मृतदेह नगरपालिकेत आणून ठिय्या !

चाळीसगाव प्रतिनिधी । रोजंदारी स्वच्छता कर्मचार्‍यांच्या पात्र यादीत नाव न आल्याचा धक्का बसल्याने बापू त्र्यंबक जाधव (५५) या स्वच्छता कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याने कर्मचार्‍यांनी त्यांचा मृतदेह थेट मुख्याधिकार्‍यांच्या दालनात आणला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर शासकीय मदत मिळाल्यानंतरच संबंधीत कर्मचार्‍याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यामुळे बुधवारी सकाळी काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, वारसांना नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांच्याहस्ते दोन लाखाच्या मदतीचा धनादेश देण्यात आल्यानंतर अत्यंविधी करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव पालिकेत एकूण १८९ रोजंदारी स्वच्छता कर्मचारी आहेत. यापैकी २६ कर्मचार्‍यांचे पात्र म्हणून समावेशन झाले आहे. २२ कर्मचार्‍यांचे पालिका स्तरावर तर चार कर्मचार्‍यांचे जिल्हास्तरावर समावेशन केले गेले आहे. उर्वरीत १५३ कर्मचार्‍यांचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आला आहे

दरम्यान, बापू त्र्यंबक जाधव (वय५५) हे सुमारे चाळीस वर्षापासून पालिकेत रोजंदारी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करीत होते. समावेशन झालेल्या स्वच्छता कर्मचार्‍यांची राज्यस्तरावरील यादी लावण्यात आली. यादीत नाव नसल्याने त्यांना धक्का बसला. आज सकाळी ते काम करीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, बापू त्र्यंबक जाधव हे अशिक्षित असल्याने त्यांचे समावेशन पात्र यादीत झाले नसल्याचा धक्का बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगत स्वच्छता कर्मचार्‍यांनी आज सकाळी अकराच्या सुमारास मृतदेह मुख्याधिकार्‍यांच्या दालनात आणला. येथेच कर्मचार्‍यांनी धरणे दिले. यावेळी कर्मचार्‍यांनी मृत कर्मचार्‍याच्या वारसास नोकरी व तातडीची पाच लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली.

या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा आशालता चव्हाण यांनी आंदोलक कर्मचार्‍यांची भेट घेतली. नगराध्यक्षा चव्हाण व मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी चर्चा करून वारसाला दोन लाख रुपये मदत देण्याचा निर्णय घेतला. मदतीचा धनादेश मृत कर्मचारी शोभाबाई जाधव यांच्याकडे सुपूर्द केला. यानंतर संबंधीत कर्मचार्‍यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकारामुळे नगरपालिकेच्या परिसरात बराच काळ तणावाचे वातावरण निर्मित झाले होते.

Protected Content