नवी दिल्ली : वृत्तसंस्था । माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी भाजपाच्या बैठकीचा स्क्रीनशॉर्ट शेअर करीत लोक जिवंत राहोत अथवा नाही मात्र निवडणुकीच्या तयारीमध्ये उशीर होता कामा नये. सध्याचं युग हे लाज सोडललेल्या सत्तेचं युग आहे, असा संताप व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशमध्ये एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसोंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या तयारीला सुरुवात झाल्याचं चित्र दिसत आहे. निवडणुकींच्या आधीच्या नियोजनासाठी भारतीय जनता पार्टीने नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेतेही सहभागी होते. भाजपाच्या याच बैठकीवरुन आता माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या सूर्य प्रताप सिंह यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
तीन हजारहून अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं आहे. तर नऊ हजारहून अधिक जणांनी ते लाईक केलं आहे.
या ट्विटवर तीनशेहून अधिक जणांनी कमेंट्सही केल्या आहेत. “देशातील अनेकांनी कोरोनासाठी मदत निधी दिलाय त्याचा वापर निवडणुकीच्या प्रचारासाठी करतील, लसीकरणासाठी करणार नाहीत,” असा टोला अमर नावाच्या व्यक्तीने लगावलाय. जावेद नावाच्या एका युझरने, “कोरोनाविरुद्धची लढाई हारलो तरी फरक पडणार नाही मात्र सत्ता मिळाली पाहिजे. तुम्हाला देश संभाळता येत नसेल तर त्याची वाट तरी नका लावू,” असं म्हटलं आहे.
काहींनी तर या निवडणूक आयोजनाच्या बैठकीवर टीका करण्याबरोबरच थेट निवडणुकींच्या निकालासंदर्भातही भाष्य केलं आहे. पौर्णिमा नावाच्या एका महिलेने, “आता पश्चिम बंगालप्रमाणे उत्तर प्रदेशही यांच्या हातून जाणार,” असं म्हटलं आहे. हेमत नावाच्या युझरने भाजपावरच निशाणा साधत, “एवढं मन लावून कोरोना नियोजनाच्या बैठका घेतल्या असत्या तर आज परिस्थिती नियंत्रणात असती. मात्र यांना लोक मेल्याने काही फरक पडत नाही,” अशी टीका केलीय.
सूर्य प्रताप सिंह हे त्यांच्या भाजपाविरोधी भूमिकेसाठी ओळखले जातात. यापूर्वीही त्यांनी कोरोना व्यवस्थापनावरुन अनेकदा उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला धारेवर धरलं आहे.