‘कॅब’साठी प्रसंगी भाजपा शिवसेनेशी तडजोडीस तयार – शेलार

aashish shelar

नाशिक, वृत्तसंस्था | ‘नागरिकत्व सुधारणा कायदा (citizenship amendment bill – CAB) हा देशासाठी आवश्यक आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दबावाला बळी न पडता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात या कायद्याची अंमलबजावणी करावी. त्यावरून काही पेचप्रसंग निर्माण झाल्यास सरकार वाचवण्यासाठी भाजप शिवसेनेशी तडजोड करण्यास तयार आहे,’ अशी खुली ऑफरच आमदार आशिष शेलार यांनी आज शिवसेनेला दिली.

 

नाशिकमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्र सरकारने आणलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहांनी नुकतीच मंजुरी दिली. मात्र, हा कायदा महाराष्ट्रात लागू होणार की नाही, यावरून संभ्रम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने या कायद्याच्या अंमलबजावणीला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांच्या सेनेची कोंडी झाली आहे. हीच संधी साधत भाजपने शिवसेनेला ऑफर दिली आहे. ‘महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत शिवसेनेचे सरकार आहे. हे सरकार वाचविण्यासाठी शिवसेनेनं देशहिताकडे दुर्लक्ष करू नये. शिवसेनेने कोणालाही न घाबरता आपला मूळ बाणा दाखवावा,’ असे शेलार म्हणाले. ‘सत्ता आणि सत्तेसाठी राजकारण हा भाजपचा कधीच हेतू नव्हता. घुसखोरांना घालवलेच पाहिजे ही आमची भूमिका आहे. त्यामुळेच आम्ही शिवसेनेशी तडजोडीला तयार आहोत, असेही ते म्हणाले.

दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘भारत बचाव’ रॅलीची शेलार यांनी खिल्ली उडवली. ‘या आंदोलनाचे नाव ‘भारत बचाव’ असे असले तरी हेतू वेगळा आहे. भारतात घुसलेल्या पाकिस्तानी व अफगाणिस्तानी घुसखोरांना वाचवा, हीच काँग्रेसची भूमिका आहे. ‘भारत बचाव’ केवळ नौटंकी आहे,’ असा टोला त्यांनी हाणला.

Protected Content