वैभव पाटील यांचा आ. किशोर पाटील यांच्याहस्ते सत्कार

पाचोरा प्रतिनिधी । मुंबईतील नुकत्याच झालेल्या वादळाच्या लहरींशी लढा देऊन आपल्या गावी पाचोरा येथे सुखरूप परत आलेल्या मुंबई येथील मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेला जवान वैभव पाटील यांचा आमदार किशोर पाटील यांनी ‘शिवालय’ निवासस्थानी हृद्य सत्कार केला आहे.

यावेळी वैभव पाटील यांनी समुद्रात सुमारे आठ तास जीवघेण्या लाटांशी  दिलेल्या अनुभवाची शौर्य गाथा कथन केली. तर आ. किशोर पाटील यांनी त्यास पुढील निर्विघ्न आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  

पाचोरा येथील  माधवराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा वैभव हा गेल्या काही वर्षांपासून मुंबई येथील मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहे. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याला मुंबई येथे नियुक्ती मिळाली. तौक्ते चक्रीवादळ मुंबईवर धडकले. त्यावेळी वैभव समुद्रात जहाजावर कार्यरत होता. समुद्रात उसळलेल्या प्रचंड लाटांमुळे वैभव व त्याचे सहकारी असलेले जहाज बुडाले. त्यावेळी त्याने हिंमत न हरता जिद्दीने समुद्रातील जीवघेण्या लाटांशी आठ तास झुंज दिली.

अशावेळी इंडियन नेव्हीचे मदतीसाठीचे जहाज वैभवपर्यंत पोहोचले. समुद्रात अक्षरशः मृत्यूशी झुंज देत असलेल्या वैभवने विशिष्ट प्रकारच्या खाणाखुणा करत मदतीसाठी आलेल्या इंडियन नेव्हीच्या जहाजास आपल्याजवळ बोलवल्यानंतर त्यास समुद्रातून सुखरूप बाहेर काढण्यात आले होते.

सत्कार समारंभाच्या कार्यक्रमास सुनिल शिनकर, माधवराव पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, स्वीय सहाय्यक राजेश पाटील, प्रविण पाटील यांची उपस्थिती होती.

 

Protected Content