जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतात दरवर्षी श्रावणी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त संस्कृत दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये संस्कृत दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्या निमित्ताने स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात प्रमुख पाहुणे प्रा.डॉ. अखिलेश शर्मा (संस्कृत विभाग मू.जे.-स्वायत्त महाविद्यालय) यांनी संस्कृत दिन साजरा करण्याचा उद्देश विशद करताना संस्कृत हा भारताचा आत्मा आहे, संस्कृत भाषेला योग्य स्थान मिळाले पाहिजे. तसेच संस्कृत भाषा जनसामान्यांपर्यंत पोचविता आली पाहिजे असे प्रतिपादन केले.
ते पुढे असे म्हणाले की, संस्कृत ही जगाचे कल्याण, शांती, सहकार्य आणि वसुधैव कुटुंबकम संकल्पना रुजविणारी भाषा आहे. त्यामुळे संस्कृत आणि संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून त्यांना कोणीही वेगळे करू शकत नाही. याप्रसंगी निबंध स्पर्धा, सुभाषित पठन स्पर्धा, संस्कृत गीत गायन स्पर्धा, स्तोत्र पठन स्पर्धा व प्रश्नोतरी स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण १०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे मेडल, पुस्तक व प्रमाणपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या स्पर्धांचे परीक्षण प्रा. दिपक चौधरी, प्रा.गणेश सूर्यवंशी,प्रा.ज्योती मोरे, प्रा.ईशा वडोदकर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.श्रीमती करुणा सपकाळे होत्या.याप्रसंगी तिन्ही शाखांचे समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे,प्रा.उमेश पाटील प्रा.प्रसाद देसाई तसेच कला मंडळ अध्यक्ष प्रा.योगेश धनगर, संस्कृत विभाग प्रमुख प्रा.अर्जुन शास्त्री मेटे,प्रसिध्दी समिती प्रमुख डॉ.अतुल इंगळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राअर्जुन शास्त्री मेटे, सूत्रसंचालन प्रा.संध्या महाजन, प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.मयुरी हरीमकर तर आभार प्रदर्शन प्रा. विजय भोई यांनी केले. याप्रसंगी कला मंडळ सदस्य,शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.