जळगाव, प्रतिनिधी | शहरात कोरोना प्रतिबंध लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांनाच पेट्रोल देण्यात यावेत असे आदेश मनपा उपायुक्त शाम गोसावी यांनी काढले आहेत. मात्र, यांसदर्भातील कोणतेही लेखी आदेश प्राप्त झाले नसल्याचे पेट्रोल पंप चालकांनी सांगितले आहे.
ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये कोरोना प्रतिबंध लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी व त्यांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी महापालिकेतर्फे कडक पावले उचलली जात आहेत.यात कोरोना प्रतिबंध लसीकरणाचे सर्टीफिकेट दाखविल्याशिवाय पेट्रोल दिले जाणार नाही असे आदेश मनपा उपायुक्त शाम गोसावी यांनी काढले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी मनपाने उचलल्या पावलांचे काही नागरिकांनी स्वागत तर काहींनी निषेध व्यक्त केला आहे. यात काही पेट्रोल पंप चालकांनी सर्टिफिकेट तपासणीसाठी मनपाने उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या नागरिकांनी लस घेतलेली नसेल अशा नागरिकांचे लसीकरणासाठी पेट्रोल पंपावरच मनपाने लसीकरण पथक नियुक्त केल्याने लसीकरणाचा वेग वाढण्यात मदत होईल अशी अपेक्षा पेट्रोल पंप चालकांनी व्यक्त केली. जळगाव पेट्रोल पंप सप्लाय कंपनीचे संचालक, दिलीप गांधी यांनी मनपाकडून याबाबत अधिकृतरीत्या कळविण्यात आलेले नसल्याचे सांगितले. पंप चालकांवर लसीकरणाचे सर्टीफिकेट तपसणी लादणे हे अन्यायकारक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. पंपावर मनपाने सर्टीफिकेट तपासणीसाठी पथक नेमावे अशी त्यांनी मागणी केली. तसेच संबधित यंत्रणेने वाहनधारकांना पास उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना मांडली. तर कामधंदे बंद असून पेट्रोल पंप चालक पेट्रोल देणार नसतील तर आम्ही जगायचे कसे अशी भावना काही वाहनधारकांनी व्यक्त केली. एक डोस घेतला असून दुसरा डोस घेण्यासाठी निर्धारित वेळ पूर्ण करणे अपेक्षित असल्याने आम्हालाही पेट्रोल देण्यात यावे अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1268031943713589