Home धर्म-समाज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आता जर्मनीत विराजमान होणार! आळंदी-पंढरपुरात विधिवत पूजन

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका आता जर्मनीत विराजमान होणार! आळंदी-पंढरपुरात विधिवत पूजन

0
2

फैजपूर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची परंपरा आणि भागवत धर्माचा भक्तिमय वारसा आता सातासमुद्रापार जर्मनीत पोहोचणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुकांची जर्मनीत स्थापना करण्यात येणार असून, तेथील अनिवासी भारतीय आणि भाविकांना माऊलींच्या पादुकांचे दर्शन घेता येणार आहे. या पादुकांचे श्री क्षेत्र आळंदी आणि श्री क्षेत्र पंढरपूर येथे विधिवत पूजन करण्यात आले आहे. फैजपूरचे सुपुत्र तथा जर्मनीत वास्तव्यास असलेले विक्रांत नरेंद्र नारखेडे हे २४ नोव्हेंबर रोजी पादुकांसह जर्मनीकडे प्रस्थान करणार आहेत.

जर्मनीत वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार विविध धार्मिक उत्सवांमध्ये या पादुकांचा पूजाविधी करण्यात येणार आहे. तसेच पालखी सोहळ्याचेही आयोजन केले जाणार आहे. जर्मनीत वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांना आणि वारकरी भक्तांना संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेता यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याची माहिती विक्रांत नारखेडे यांनी दिली.

या महत्त्वपूर्ण धार्मिक उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर नवीन पादुकांचे पहिले विधिवत पूजन श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडले. डिगंबर महाराज मठ संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे आणि वारकरी महामंडळाचे महामंत्री नरहरी महाराज चौधरी यांनी या पूजनाचे आयोजन केले होते. यावेळी माऊली मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम पाटील आणि चैतन्य महाराज लोंढे यांची विशेष उपस्थिती होती.

समाधी मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजाविधी संपन्न झाल्यानंतर वारकरी महामंडळाचे महामंत्री नरहरी महाराज चौधरी आणि नरेंद्र नारखेडे यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका विक्रांत नारखेडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने पादुकांचे दर्शन घेतले.

आळंदी येथील पूजनानंतर श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातही पादुकांचे दर्शन आणि पूजन करण्यात आले. पूज्य प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक विधी पार पडला. विक्रांत नरेंद्र नारखेडे, सौ. प्रज्ञा नारखेडे आणि नरेंद्र नारखेडे यांच्या हस्ते पुरोहितांनी पादुकांची पूजा व अभिषेक केला. त्यामुळे आळंदीतील माऊलींच्या चरणी पूजन झाल्यानंतर पंढरपूरच्या विठुरायाच्या चरणीही पादुकांना वंदन करण्याचा भक्तिमय योग साधण्यात आला.

त्यानंतर पंढरपूर येथील डिगंबर महाराज मठात पादुकांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी पादुकांचे दर्शन घेतले. या प्रसंगी पंढरीनाथ आरू, वासुदेव महाराज पाटील, घनश्याम पाटील, किशोर बोरोले, विठ्ठल भंगाळे, विजय महाजन (रोझोदेकर), टेनू फेगडे, हरीश अत्तरडे, अतुल तलेले, धनंजय फिरके, हर्षद महाजन, किरण ओंकार चौधरी, शीतल महाजन, मुकुंद भंगाळे, मयूर नारखेडे आणि पुष्कर नारखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, जर्मनीमध्ये वारकरी संप्रदायाचे विविध धार्मिक उत्सव, पालखी सोहळे आणि वर्षभरातील हिंदू सण-उत्सवांचे नियमित आयोजन फैजपूर येथील विक्रांत नारखेडे यांच्या पुढाकाराने केले जाते. परदेशात राहूनही भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि संतविचारांची जपणूक करण्यासाठी त्यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांची जर्मनीत स्थापना हा याच धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

याच काळात श्री क्षेत्र पंढरपूर येथील डिगंबर महाराज चिनावलकर मठात कार्तिक वारीनिमित्त पारंपरिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात गायन गंधर्व पंढरीनाथ महाराज आरू यांच्या प्रमुख उपस्थितीत सामूहिक विठ्ठल नामजप करण्यात आला. विठ्ठल नामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला. वारकरी आणि भाविकांनी नामजपात सहभागी होत भक्तिरसाचा अनुभव घेतला.

या महोत्सवाच्या व्यासपीठावर दिंडी प्रमुख दुर्गादास महाराज नेहते, भगवंत महाराज चौधरी, वासुदेव महाराज पाटील, संजय महाराज विटवेकर, अमोल महाराज भंजले, तेजस महाराज आणि मोहित महाराज यांची साथसंगत लाभली. तसेच भरत महाराज महिसावाडीकर, जयेश महाराज अंजाळेकर, अमोल महाराज रावेरकर आणि दुर्गादास महाराज नेहते यांची कीर्तने संपन्न झाली. कीर्तन आणि नामस्मरणाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायातील भक्तीपरंपरेचा जागर करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांच्या अध्यक्षतेखाली हा महोत्सव सुरू आहे. महोत्सवाच्या आयोजनासाठी उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोले, विश्वस्त जयराम पाटील, अतुल तलेले, जनार्दन भारंबे, हरीश अत्तरडे यांच्यासह मधुकर बोडे, प्रल्हाद महाजन, प्रशांत चौधरी, धनंजय फिरके सर, हर्षद महाजन, किरण चौधरी, विक्रांत नारखेडे, सुनील नारखेडे आणि प्रमोद बढे यांचे सहकार्य लाभत आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे आळंदी आणि पंढरपूर येथे विधिवत पूजन झाल्यानंतर त्या जर्मनीत स्थापन होणार आहेत. विक्रांत नारखेडे यांच्या पुढाकारातून वारकरी संप्रदायाची भक्तीपरंपरा परदेशात पोहोचणार असून, २४ नोव्हेंबरच्या प्रस्थानाकडे फैजपूरसह वारकरी भक्तांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील संतपरंपरेचा हा वारसा आता जर्मनीतील भाविकांनाही अनुभवता येणार आहे.


Protected Content

Play sound