Home Cities यावल क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंतीचा यावलमध्ये उत्साह; महिला बचत गटांसह शेतकऱ्यांना योजनांचा लाभ!

क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंतीचा यावलमध्ये उत्साह; महिला बचत गटांसह शेतकऱ्यांना योजनांचा लाभ!

0
12

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त आयोजित जनजातीय गौरव सप्ताहाचा समारोप १८ नोव्हेंबर रोजी उत्साहात झाला.यावेळी रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांच्या लाभांचे वितरण करण्यात आले, तसेच गुणवंत विद्यार्थी, नवनियुक्त शिक्षक आणि आदिवासी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

 

आदिवासी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ९२ महिला बचत गटांना लाभ देण्यात आला. कृषी विभागामार्फत चार लाभार्थ्यांना ट्रॅक्टर, तर पशुसंवर्धन विभाग व पंचायत समिती यांच्यातर्फे १६ आदिवासी शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. तसेच चोपडा, रावेर व यावल तालुक्यांतील लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ, रेशन कार्ड तसेच वनहक्क कायद्यांतर्गत लाभांचे वितरण करण्यात आले. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त १६ नवनियुक्त शिक्षकांचे स्वागत करण्यात आले, तर ‘पुढारी टॅलेंट सर्च’ परीक्षेत यश मिळविणाऱ्या सहा गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय आरोग्य परिषदेत सहभागी झालेले मुनाफ तडवी, कलिंदर तडवी व पारंपरिक वैदू यांच्यासह दिल्लीतील महिला उद्योजक मेळाव्यासाठी निवड झालेल्या हिना जमादार यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानिमित्त प्रकल्प कार्यालय यावल, इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव आणि तालुका आरोग्य अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यात ३४ जणांनी रक्तदान केले, तर ४० नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.

याशिवाय आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती, आधार नोंदणी, कृषी विज्ञान केंद्र पालतर्फे शेतीविषयक मार्गदर्शन, पारंपरिक आदिवासी उपचार पद्धती, पेसा जनजागृती पथनाट्य, चारा सॅक्स निर्मितीचे मार्गदर्शन आणि व्यसनमुक्तीविषयक पथनाट्य सादर करण्यात आले.

या कार्यक्रमाला जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी, उपविभागीय अधिकारी बबन काकडे, प्रकल्प अधिकारी अरुण पवार, तहसीलदार मोहनमाला नाझिरकर, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, आदिवासी संघटनांचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले, तर सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रविण दाभाडे यांनी आभार मानले.


Protected Content

Play sound