यावल नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ७ मधील वाणी गल्ली परिसरात गटाराची समस्या गंभीर बनली होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात घेऊन प्रभागाचे नगरसेवक पराग विजय सराफ यांनी या समस्येचा सातत्याने पाठपुरावा केला. रावेर-यावल मतदारसंघाचे आमदार अमोल हरीभाऊ जावळे तसेच माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक अतुल पाटील यांनीही या प्रश्नाकडे विशेष लक्ष देत निधी मंजुरीसाठी प्रयत्न केले.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२६-२७ अंतर्गत नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेतून हे काम मंजूर करण्यात आले आहे. यावल नगरपरिषद हद्दीतील वाणी गल्लीमध्ये सुनील श्रावगी यांच्या घरापासून ते बाविसे सर यांच्या घरापर्यंत नवीन गटार बांधण्याचे काम प्रस्तावित आहे. या कामासाठी १९ लाख ९० हजार ९५० रुपयांच्या निधीला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरविकास शाखेकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
प्रभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने नगरसेवक पराग सराफ यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या कामासाठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल आमदार अमोल जावळे आणि माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांचे त्यांनी आभार मानले. नव्या गटार बांधकामामुळे परिसरातील स्वच्छतेचा आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



