मुंबई (वृत्तसंस्था) सुशांत सिंहच्या वडिलांचे दोन विवाह झाले होते, त्यामुळे सुशांत नाराज होता, असे संजय राऊत यांनी ‘सामना’तील या लेखात म्हटले होते. मात्र सुशांतच्या कुटुंबीयांनी या आरोपांचे खंडन केले होते. त्यानंतर आता सुशांतचा चुलत भाऊ तथा भाजपचा आमदार नीरज सिंह बबलू शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहे.
के के सिंह आणि कुटुंबावरील वैयक्तिक आरोपांवरुन नीरज सिंह संजय राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार आहे. तसेच संजय राऊत यांनी सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी मागणीही नीरज सिंह यांनी केली आहे. सुशांतचे त्याच्या वडिलांशी संबंधित चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. सुशांतच्या वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक एफआयआर दाखल करायला लावला गेला. म्हणून मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. दरम्यान, संजय राऊत यांचे आरोप सुशांत सिंहच्या कुटुंबीयांनी फेटाळले आहेत. संजय राऊत धादांत खोटे बोलत असल्याचे सुशांतचे मामा आर. सी. सिंह यांनी म्हटले आहे. सुशांतच्या वडिलांचे एकच लग्न झाले आहे, त्यानी दुसरे लग्न केलेच नाही. सर्व चुकीच्या गोष्टींना लपवण्यासाठी चुकीचे आरोप केले जात आहेत, असे ते म्हणाले.