श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना मैदानी खेळांचे प्रशिक्षण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे विद्यार्थ्यांना मैदानी खेळ खेळण्याची माहिती व्हावी, पारंपरिक खेळांचा प्रसार व्हावा या हेतूने ‘क्रीडा दिन’ घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यानि विविध खेळ खेळून उपक्रमात उत्साह आणला. संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला.

 

पारंपरिक मैदानी खेळ लोप पावत चालले असून, तंत्रज्ञानाच्या युगात केवळ मोबाइलवर गेम खेळण्याकडे मुलांचा कल वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. पूर्वीच्या काळात पारंपरिक खेळाबरोबर मुले मैदानी खेळालाही विशेष प्राधान्य देत. त्यामुळे शारीरिक व्यायामदेखील होत असे. पूर्वीचे पारंपरिक खेळ मोबाइलमधल्या गेममुळे कालबाह्य ठरले असून, आता फक्त त्यांच्या आठवणीच उरल्या आहेत. त्यामुळे शाळेत मुलांना  विटी-दांडू, लगोरी, लपाछपी, भातुकली खेळ शिकविण्यात आले. सागर गोट्या, कानगोष्टी, सारिपाट, नवा व्यापारी, सापशिडी यांसारखे बैठे खेळदेखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दाखविले.

 

कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आली. त्यांनी उपक्रमाचे कौतुक केले. बुद्धिबळ, कॅरम, खो-खो, कबड्डी या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उपक्रमात उत्साह आणला. प्रसंगी मुख्याध्यापिका शीतल कोळी यांनी मुलींना क्रीडा विकास आणि शारीरिक शिक्षण याविषयी माहिती सांगितली. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content