शेतीला ८ तास वीज , दर कमी करण्यासाठी नियोजनाचे ऊर्जामंत्र्यांचे महावितरणला निर्देश

 

 

मुंबई: वृत्तसंस्था ।  राज्यात वीजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा  ८  तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले

 

नवीन कृषिपंप वीज धोरणात शेतकऱ्यांना ८ तास दिवसा वीज देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि कृषीपंप वीज वाहिन्या अतिभारीत  होत असल्याच्या तक्रारी मिळत असल्याने वीज वाहिन्यांचे जाळे सक्षम करणे. रोहित्रांची संख्या व क्षमता वाढविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम त्वरित करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राज्यातील किती ठिकाणी आणि कोणते रोहित्र दिवसा ८ तास वीज देण्यास सक्षम नाही, हे शोधून त्यांच्या सक्षमीकरणासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

 

अन्य राज्याच्या तुलनेने औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. “राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करणे गरजेचे आहे.त्यामुळे वीजदर किमान १ रुपया प्रति युनिटने कमी करण्यासाठी प्रयत्न करावे आणि सोबतच घरगुती व वाणिज्यिक दरही कमी करण्यासाठी नियोजन करा,” असे डॉ. राऊत यांनी यावेळी निर्देश दिले.

 

नवीन अपारंपरिक ऊर्जा धोरणांमुळे स्वस्त दरात वीज उपलब्ध होणार आहे. यामुळे औद्योगिक ग्राहकांवरील क्रॉस सबसिडीचा भार कमी होणार आहे. राज्यात उद्योगाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार प्रयत्नशील असून भविष्यात विजेची मागणी वाढणार असल्याने स्वस्त वीजेची खरेदी करण्यासाठी आराखडा तयार करा, असेही निर्देश त्यांनी यावेळी दिले. सदर बैठकीस महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, महानिर्मितीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे व इतर वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Protected Content