पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील शेतकऱ्याच्या शेतातील पत्री शेडमधुन अज्ञात चोरट्यांनी १० क्विंटल कापुस, सोलर पॅनल व शेती औजारे लांबविल्याची घटना सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील दहिगाव संत येथील शेतकरी गोकुळसिंग इंद्रसिंग पाटील (वय – ७०) या वृद्ध शेतकऱ्याची माहेजी रोडवर शेत गट क्रमांक २०३ (अ) ही शेत जमिन असुन या शेतात गोकुळसिंग पाटील यांनी कपाशी पिकाची लागवड केली असुन सद्यस्थितीत कापुस वेचणी सुरू आहे. दरम्यान दि. १३ नोव्हेंबर पर्यंत मजुरांकरवी जमा केलेला सुमारे ८ ते १० क्विंटल कापुस शेतात बांधलेल्या पत्री शेडमध्ये ठेवण्यात आला होता. दरम्यान शेतकरी गोकुळसिंग पाटील हे एरंडोल येथे गेले असता दि. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ८:३० वाजता सालदार अनिल उद्यसिंग पाटील हे शेतात गेले असता त्यांना पत्रीशेडला लावलेले कुलुप तोडलेल्या अवस्थेत आढळुन आल्याने अनिल पाटील यांनी तात्काळ गोकुळसिंग पाटील यांनी भ्रमणध्वनी द्वारे कल्पना देताच गोकुळसिंग पाटील हे शेतात दाखल झाले असता पत्री शेडमध्ये ठेवलेला ८० हजार रुपये किंमतीचा ८ ते १० क्विंटल कापुस, लाईटसाठी लागणारे सोलर पॅनल व बॅटरी तसेच ३ हजार रुपये किंमतीचे शेती औजारांसह एक पत्री पेटी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याचे उघडकीस आले. गोकुळसिंग पाटील यांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदविला असुन या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल सचिन पवार हे करीत आहे.